नवी दिल्ली : राफेलचे भूत अद्यापही मोदी सरकारच्या मानगुटीवर आहे. कॉंग्रेसकडून सातत्याने राफेलचा मुद्दा उपस्थित करून आरोप केला जातो. दरम्यान आता राफेल डीलवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका दिला आहे. राफेल डील प्रकरणाची दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शविली असून याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून लावला आहे.
राफेल डीलवरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला विरोधकांनी लक्ष केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभांमधून राफेल डील प्रकरणी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. यातच आता सुप्रीम कोर्टाने दुसऱ्यांदा या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नरेंद्र मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्यांच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून लावला आहे. तर कोर्टात सादर करण्यात आलेली कागदपत्रे वैध असल्याचे म्हटले आहे.