राफेल विमानामुळे हवाई दलाच्या युद्ध क्षमतेत वाढ होणार – हवाईदल प्रमुख

0

नवी दिल्ली : राफेल विमानामुळे हवाई दलाच्या युद्ध क्षमतेमध्ये वाढ होणार आहे असे सांगत राफेल डीलला राजकारणाचा मुद्दा बनवू नका. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. असे हवाई दल प्रमुख एअर मार्शल बी. एस. धानोआ यांनी सांगितले. धानोआ बुधवारी जोधपूर येथील हवाई दलाच्या तळावर आले होते.

धानोआ यांनी भारतीय लष्कराच्या बोफोर्स तोफांचे उदाहरण दिले. बोफोर्स तोफांच्या बाबतीत काय झाले ? ते तुम्ही लष्काराला विचारा. त्यामुळे एखाद्या उपकरणावरुन तुम्ही राजकारण करता तेव्हा त्याचा खरेदी प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. मी न्यायालयाच्या निर्णयावर मतप्रदर्शन करणार नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो असेही धानोआ म्हणाले.

हवाई दलाला नव्या लढाऊ विमानांची आवश्यकता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. आपला पैसा कुठे खर्च होतोय हे करदात्याला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी आपल्याकडे कॅगची व्यवस्था आहे. प्रत्येक सुरक्षा मुद्दाचे राजकारण केले तर त्याचा सैन्य दलाच्या आधुनिकीकरणावर परिणाम होतो. जीसॅट-७ ए मुळे हवाई दलाच्या कम्युनिकेशन क्षमतेमध्ये वाढ होणार आहे असे धानोआ यांनी सांगितले.