राफेल विमान खरेदीत ३६ हजार कोटींचा घोटाळा – प्रकाश आंबेडकर

0

बार्शी : मोदी सरकारने राफेल विमान खरेदीत एका विमानामागे एक हजार कोटी याप्रमाणे ३६ विमानांच्या खरेदीत ३६ हजार कोटींचा घोटाळा केला आहे असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मनमोहनसिंग यांनी ५७० कोटींना खरेदी केलेले राफेल विमान मोदी सरकारने १६०० कोटीला का घेतले? असा सवाल त्यांनी केला आहे. बार्शी (जि. सोलापूर) येथे आयोजित जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, नोटाबंदी, राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाने हजारो कोटी रुपये लाटल्याचा आरोपही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. पैसे लाटण्यासाठीच नोटाबंदी केली. यात त्यांनी ४० टक्के पैसा लाटला. नोटाबंदीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. शेतकरी नेते प्रश्नाला हात घालण्याऐवजी दराला हात घालतात. सरकारने हमीभावाने खरेदी केलेला माल व्यापाऱ्यांना त्या दराने निमूटपणे घ्यावा लागेल. परंतु, तसे करण्याऐवजी व्यापाऱ्यांवर सक्ती करत आहेत. ते व्यापार करायला बसलेत की दान करायला? निवडणुका आल्याने राममंदिराचा मुद्दा येत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले. काँग्रेसबरोबर युती करताना संघाविरोधात कसे लढायचे? हा पहिला अजेंडा होता. प्रश्न सत्तेचा नव्हे तर कायद्याचा आहे. देशविघातक संघटनांपासून सावध राहा. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले.