पाटणा : रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. सीबीआयने राबडी देवी यांच्यासह त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची सुमारे चार तास चौकशी केली. सीबीआयचे 12 हून अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले होते. दरम्यान, याप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अनेक ठिकाणांवर यापूर्वीही छापेमारी करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरी येथील हॉटेलच्या निविदावाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. लालूंसोबत पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव आणि आयआरसीटीसीचे माजी व्यवस्थापकीय संचालकांसह आणखी आठ जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.