रामजन्मभूमीवर फक्त राममंदीरच होईल!

0

उडुपी (कर्नाटक) : अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदीरच उभारले जाईल. तेथे अन्य दुसरे काहीही निर्माण केले जाणार नाही व त्या पवित्र भूमीवर भगवाच फडकेल. ही काही आमची केवळ लोकप्रिय घोषणा नाही तर तो आमचा दृढविश्वास आहे. अयोध्येत ज्या शिळा नेण्यात आल्या आहेत, त्याच शिळांद्वारे मंदीर उभे राहील. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आम्ही ज्या क्षणाची वाट पाहात आहोत, ते क्षण साकार करण्यासाठी आता अनुकूल वातावरण आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्न आणि त्यागानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. सद्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असले तरी मंदिरनिर्माणाबाबत जी जागृकता आम्हाला करावयाची होती ती झाली आहे, असे ठोस प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. कर्नाटकातील उडुपी येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित धर्मसंसदेत सरसंघचालक बोलत होते. देशभरातील संत, मठाधीश, महंत आणि धर्मगुरु यांनी या संसदेला हजेरी लावलेली आहे.

गोरक्षण ही आमची संस्कृती!
येत्या 5 डिसेंबरपासून अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. या मुद्द्यावर न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाने त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अयोध्येत राम मंदीर व लखनऊमध्ये मशीद उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. भागवत यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. यावेळी डॉ. भागवत यांनी गोरक्षकांच्या मुद्द्यावरुही भाष्य केले. लोकांकडून आमच्या गोरक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गायीचे रक्षण ही आमची संस्कृती आहे. जोपर्यंत गोहत्येवर बंदी आणली जात नाही, तोपर्यंत आम्ही शांतपणे जगू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये तीन दिवस धर्मसंसद चालणार असून, यामध्ये राम मंदीर आणि हिंदू धर्माशी संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवीशंकर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

शिया बोर्डातील वादही चव्हाट्यावर
जन्मभूमीचा वाद संपुष्टात आणण्यासाठी श्री श्री रवीशंकर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना शिया वक्फ बोर्डानेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बोर्डाने राम मंदीर आणि बाबरी मशिदीचा वाद सोडविण्यासाठी एक प्रस्ताव दिला असून, अयोध्येत राम मंदीर, तर लखनऊमध्ये बाबरी मशीद, असा हा प्रस्ताव आहे. लखनऊमध्ये उभारण्यात येणार्‍या मशिदीला कोणत्याही मुस्लीम शासकाचे नाव न देता मस्जिद-ए-अमन म्हटले जावे, असेही बोर्डाने सुचवले आहे. यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमधील अनेक वर्षांपासून सुरु असलेला वाद संपुष्टात येईल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे, शिया पर्सनल लॉ बोर्ड मात्र मशीद जागेवरुन हटवण्यात तयार नाहीत. बोर्डाचे संस्थापक मौलाना सय्यद अली हुसे रिजवी यांनी सांगितले, की शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिजवी नाटके करत आहेत. रिजवी संपूर्ण शिया पंथाला बदनाम करत आहेत. कायदेशीर अटक टाळण्यासाठी ते आरएसएसची भाषा बोलत आहेत. अयोध्येत राम मंदीर उभारण्यावर मुस्लिमांचा काहीच आक्षेप नाही. पण बाबरी मशिदीच्या जागेवर कब्जा करत मंदीर उभारलेले कोणत्याही मुस्लिमाला मान्य नाही, असेही ते बोलले होते.