शहरातील मंदिरामध्ये श्रीराम नवमी जल्लोषात साजरी ; मोरया व माँ संस्थेच्या मिरवणुकीने वेधले लक्ष ; चिमुकले राममंदिरात मंत्री, आमदारद्वयींची उपस्थिती
जळगाव- शहरात शनिवारी श्रीराम नवमी जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त श्रीराम मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरातील प्रमुख श्रीराम मंदिर संस्थान, चिमुकले राम मंदिर व बळीराम पेठेतील जुने बळीराम मंदिर, बांभोरी येथील मंदिरात नागरिकांनी जन्म सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांची उशीरापर्यंत गर्दी केली होती. तसेच मोरया व माँ संस्थेतर्फे काढण्यात आलेल्या गीत, वाजंत्रींच्या तालातील मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. भाविकांनी या मिरवणुकीत ठेका धरला होता.
मंत्री, आमदारांनी ओढला चिमुकले राम मंदिरात फुलांनी सजविलेला पाळणा
शहरातील नवीन बस स्थानका समोरील चिमुकले राम मंदिरात भक्तीमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मंदिरास आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्रीरामांची प्रतिमा असलेला पाळणा देखील फुलांनी सजविला होता. या वेळी चिमुकले राम मंदिराचे दादा महाराज जोशी यांनी राम जन्मोत्सवाची कथा सांगितली. यानंतर दुपारी 12 वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, सिंधी ग्रामपंचायतचे कार्याध्यक्ष गुरुमुख जगवाणी यांच्या हस्ते पाळण्याची दोरी हलवून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी भाविकांनीही पाळणा हलवून श्रीराम जन्मसोहळा साजरा केला. यानंतर प्रत्येकास पंजिरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर भक्तांची दर्शन घेण्यासाठी गर्दी होती. रात्री उशीरा मंदिरात रामरक्षा पठण करण्यात आले.
श्रीराम मंदिरात दिवसभर कार्यक्रम
जळगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्म कथा कीर्तनातून सांगून व पुषपवृष्टी करत जन्मसोहळा साजरा करण्यात आला. पहाटे 4 वाजता काकडा आरती, भजन व प्रभू श्रीरामांना महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 7 वाजता मंगल आरती झाली. हभप मंगेश महाराज यांचे राम जन्माचे कीर्तन झाले. यात त्यांनी श्रीरामांच्या जन्माची कथा भाविकांना सांगितली. दुपारी 12 वाजता टाळ,घंटा, शंख, नगारा, ढोल, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पुषपवृष्टी करत श्रीराम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी घंटानाद, शंखनादाच्या स्वरातून श्रीरामांची आरती करण्यात आली. त्यानंतर मोहननगर येथील सुश्राव्य महिला भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. यानंतर सायंकाळी 6.30 वाजता धुपारती, शांतीपाठ, वेदमंत्र जागर झाले. यानंतर संस्कार भारती परिवारातर्फे गीत रामायणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात जैन इरिगेशनच्या कला विभागातील सहकारी आनंद पाटील यांनी साकारलेल्या श्रीराम मंदिर संस्थानाच्या लोगोचे जैन फार्म फ्रेश फूडचे संचलाक अथांग जैन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी श्रीराम संस्थानचे गादीपदी मंगेश महाराज जोशी, हभप विखरणकर महाराज, वसंत जोशी, दादा नेवे, गिरीश कुलकर्णी, अशोक जोशी, ऍड. सुहास जोशी, ब्रह्मश्री परिवाराचे चंद्रकांत पाठक, अशोक वाघ, डॉ. निलेश राव, कमलाकर फडणीस,डॉ. अविनाश सोनगीरकर,प्रा. देवनारायण झा, हभप सुदाम महाराज , रवींद्र शुक्ल, मुकुंद धर्माधिकारी उपस्थित होते.