रामदास आठवलेंची ‘गो.. गो..करोना’ची स्टाईल मारत नितीन लढ्ढा म्हणाले,‘गो…कचरा…गो, गो…वॉटरग्रेस…गो’

0

जळगाव : देश- विदेशात कोरोना विषाणूने कहर माजविला आहे. ठिकठिकाणी कोरोनाच्यात गप्पा ऐकायला मिळत आहे. सोशल मीडियावरही कोरोना आणि कोरोनाच आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा गो…कोरोना…गो चा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायलर होत असून भाव खाऊन जात आहे. याच व्हिडीओची प्रचिती मनपाच्या स्थायी समितीत अनुभवायला मिळाली. देश-विदेशात कोरोनाने कहर केला असला तरी जळगावही काही मागे नाही. जळगाव शहरात तर सध्या स्वच्छतेचा प्रश्‍न जटील बनला आहे. मनपाने सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे.मात्र मक्तेदाराने गेल्या 20 दिवसांपासून कामबंद केल्याने सर्वत्र कचराकोंडी झाली आहे. साफसफाई होत नसतांना नागरिकांकडून आकारण्यात येत असलेले 2 टक्के साफसफाई कर रद्द करण्याची मागणी करत शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी रामदास आठवलेंची ’गो.. गो..करोना’ची स्टाईल मारत ’गो…कचरा…गो, गो…वॉटरग्रेस…गो’ असे म्हणून विडंबन करताच सभागृहात हशा पिकला.

प्रशासनावर ओढले ताशेरे

सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर नितीन लढ्ढा यांनी मनपाच्या उत्पन्नाची वस्तूस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. मालमत्ता कराची 76 कोटी 31 लाखांची मागणी असताना केवळ 41 कोटी 51 लाख अर्थात 54 टक्के वसुली झाली आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांची वसुली 63 कोटी झाली असून 162 कोटी वसुली होणे अपेक्षित आहे. जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न कमी असून चिंतेचा विषय आहे. मात्र प्रशासनाला गांर्भिय नाही असे म्हणत नितीन लढ्ढा यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.उत्पन्न होत नसेल तर मनपा चालवायची कशी असा सवाल उपस्थित करुन ’अर्थ’च येणार नसेल तर नियोजन शून्य असल्याची टिका लढ्ढा यांनी केली.

शहरात स्वच्छतेचा तिढा कायम

महानगर पालिकेने शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा मक्ता नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिला. पाच महिन्यापासून मक्तेदाराचे काम सुरू असून मक्तेदाराच्या पाच महिन्यापासून शहरातील स्वच्छतेबाबत तक्रारी वाढतच आहे. गेल्या वीस दिवसापासून शहरातील स्वच्छतेचे कामबंद केल्याने शहरात सर्वत्र कचरा साचलेला आहे. त्यामुळे शहरातील आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यात आमदार राजूमामा भोळे यांनी दोन दिवसापूर्वी विधानसभेत मक्तेदाराचा मक्ता का रद्द केला जात नाही अशी लक्षवेधी सूचना मांडली होती. तरी देखील महापालिका प्रशासन मक्तेदारावर का कारवाई केली नाही. मक्तेदार आता न्यायालयात गेला असून स्वच्छतेचा तिढा अजून वाढला आहे. त्यामुळे आता ’गो…कचरा…गो, गो…वॉटरग्रेस…गो’ अशी म्हणण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी विडंबन केले. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम संथगतीने

शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी 3 मार्च 2018 रोजी कार्यादेश दिले होते. उड्डाणपुलासाठी दिलेली 18 महिन्यांची मुदत 4 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आली. त्यानंतर 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली असून ही मुदतदेखील 31 मार्च 2020 रोजी संपुष्टात येणार आहे. तरीदेखील अद्याप काम पूर्ण झाले नसून संथगतीने काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे काम झाले असते तर बोगद्यासाठी 10 कोटीची तरतूद करण्याची गरज नसती असेही नितीन लढ्ढा यांनी सांगितले.

सफाई कर 2 टक्के रद्द करा

साफसफाईवर 2 टक्के कर लावण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून वसुल करण्यात येत आहे. सोयी सुविधा देवू शकत नाही तर नागरिकांकडून सफाईपोटी होत असलेली 2 टक्के करआकारणी रद्द करावी अशी मागणी नितीन लढ्ढा यांनी केली.यावर सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी महासभेत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव ठेवावा अशी सूचना केली. शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोपही लढ्ढा यांनी केला. तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी दिरंगाई होत असल्याने आणि शहरात साफसफाई होत नसल्याने नितीन लढ्ढा यांनी उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांना चांगलेच धारेवर धरले.