मुंबई । राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य मंत्रिमंडळातील सदस्य असूनही राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात येण्यात नसल्याचे आरोप करत मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. तसेच कोणताही निर्णय घेताना तो पहिल्यांदा मंत्रिमंडळात घेतला पाहिजे अशी मागणी करत कदम यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केले. नेहमीप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज घेण्यात आली. त्या बैठकीत अजेंड्यावरील विषयांची चर्चा झाल्यानंतर इतर विषयांवरील चर्चेस सुरुवात झाली. त्यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी चांगलेच भाजपला चांगलेच लक्ष्य केले.
तुमची ही कसली सुकाणू समिती असा सवाल
कोणताही निर्णय घेताना प्रथम मंत्रिमंडळात घेतला पाहिजे, तुमची ही कसली सुकाणू समिती असा सवाल करत मला मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून माहिती घेणे आवश्यक आहे, आता पर्यंत तुम्ही जे काही निर्णय घेतले ते मंत्रिमंडळाला वगळून घेतले असून हा काय पोरखेळ लावलाय असा जोरदार शाब्दीक हल्ला कदम यांनी बैठकीत केला. अखेर संतापलेल्या कदम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही मंत्रिमंडळ अस्तित्वात असताना तुम्ही कसली सुकाणू समितीची चर्चा करताय मंत्रिमंडळापेक्षा सुकाणू समिती मोठी आहे का, आम्हाला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता ठराविक मंत्रीच निर्णय घेत असतात, आम्हाला सरकारमध्ये काही किंमंत नाही का असा खडा सवालच बैठकीत केला. जो पर्यंत तुम्ही कर्जमाफीचे निकष बदलत नाही, तो पर्यंत आम्ही कर्जमाफीला विरोध करू असा इशारा कदम यांनी दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत चांगलाच तणाव निर्माण झाला. यावेळी चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन या मंत्र्यांनी कदम यांना शांत राहण्याची विनंती केली. तरीही कदम शांत होत नसल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी मध्यम मार्ग काढत कदम यांच्या दालनात जावून त्यांची समजूत काढण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.
क्रमांक दोनचे मंत्री असूनही कदम यांच्या दालनात
त्यानंतर दुपारी अडीच वाजता चंद्रकांत पाटील हे क्रमांक दोनचे मंत्री असूनही कदम यांच्या दालनात पोहचले. आणि सुमारे पाऊण तास बंद दाराआड कर्जमाफीची चर्चा केली. चंद्रकांत पाटील यांच्या समजावणीमुळे रामदास कदम यांचा राग शांत होईल का की पुन्हा शिवसेनेची भूमिका मांडत कर्जमुक्तीचा वेगळा राग आळवतात का अशी उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली. मात्र अखेर चंद्रकांत पाटील यांना कदम यांची समजूत काढण्यात यश आले आणि नंतर ते दोघेही हसत अँण्टी चेंबपमधून बाहेर आले. आणि हसत बघा आमची युती अभेद आहे असा मिश्कील विनोदही कदम यांनी केला. सदर माहीती मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचवित दिलजमाई झाल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी कदम यांना लगेच निरोप पाठवित चहास पाचारण केले.
शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. याबाबत राज्य सरकारची भूमिका शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना सांगण्यात आली होती. तरीही त्यांच्या मनात काही शंका आहेत. त्यामुळे राज्याच्या स्थैर्याकरीता आणि आर्थिक स्थिरतेकरीता पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
-चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री
कदम यांचे आकांडतांडव तर रावते शांत
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी आणि सूकाणू समितीशी चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. या उच्चाधिकार मंत्रिगटात शिवसेनेचे दिवाकार रावते यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र रामदास कदम हे मुख्यमंत्री आणि भाजपला टार्गेट करत असताना मात्र दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शांतच राहणे पसंत केले.