पुणे : इंटरनॅशनल डे ऑफ अॅक्शन फॉर रिव्हर्सच्या निमित्ताने किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकराने पुण्यातील विविध पर्यावरणस्नेही संस्थांच्या सहकार्याने होणार्या रामनदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला. पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रामनदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष माधव चंद्रचुड, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, अनिल गायकवाड, शैलजा देशपांडे, डॉ. सचिन पुणेकर, विनोद बोधनकर यावेळी उपस्थित होते. पुणेकरांना फारशी माहित नसणारी सुमारे 18 किलो मीटर लांबीची राम नदी सध्या अत्यंत वाईट अवस्थेत आहे. वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकुम, भुगाव, बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध या मार्गाने ही नदी मुळा नदीला मिळते. भुकुम, भुगाव, बावधन अशा 3 ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर असून बावधन ते औंध हा भाग पुणे महानगरपालिका क्षेत्रात येतो. राम नदीचे 18 विभाग करण्यात आले असून प्रत्येक विभागाचे प्राधान्य क्रमाने कृती कार्यक्रम ठरविण्यात आले असल्याचे माधव चंद्रचुड यांनी सांगितले.
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गेली 13 वर्षे आम्ही पर्यावरण, वन्यजीवन, उर्जा, हवा आणि पाणीविषयक जनजागृती तसेच कृती कार्यक्रम करीत आहोत. पुण्याबरोबरच भारतातील 7 राज्यांतील सुमारे 30 शहरांमध्ये हा महोत्सव पोहोचला असून त्याठिकाणी अनेक सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीने वातावरण तयार झाले आहे. रामनदी पुनरूज्जीवन हा देखील असाच एक कृती कार्यक्रम आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या संस्था, तज्ज्ञ, सुमारे 35 महाविद्यालयातील हजारो इकोरेंजर्स, तीन किर्लोस्कर कंपन्या, वृत्तसंस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहयोगाने कृती आराखड्याची घोषणा करण्यात आली आहे. समाजातील विविध घटकांच्या सहभागातून जनजागृती, माध्यमांद्वारे जागृती, कार्यशाळा, शिबीरे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग यामध्ये असणार असल्याचे वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले.
Prev Post