खडकी : पुणे शहर आणि ग्रामीण परिसरात चोर्या करणारी रावण टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीने पुणे ग्रामीण भागात अनेक ठिकणी चोर्या केल्या असून पोलिस त्यांच्या मागावर होते. अनेक वेळा पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या या टोळीला राम नवमी दिवशी चोरीच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली. ही कारवाई युनिट चारच्या पोलिसांनी खडकीमध्ये बुधवार मध्यरात्री दोनच्या सुमारास आर्मी सप्लाय डेपो समोर, औंध रोड खडकी रेल्वे स्टेशनजवळ केली.
अनिकेत राजू जाधव (वय-21, रा. जाधववस्ती, रावेत), विनोद निजाप्पा गायकवाड (वय-22, रा. वल्हेकरवाडी, चिंचवड), रवि काशिनाथ अशिंगळ (वय-20, रा. रावेत), अविनाश राजेंद्र जाधव (वय-24, रा. रावेत), सागर सीताराम जधाव (वय-26, रा. रावेत), अरीफ शमशुद्दीन शेख (वय-26, रा. चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चार चे सहायक पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
5 लाख 79 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे ग्रामीण परिसरात चोर्या करणार्या रावण टोळीमुळे दहशत पसरली होती. या टोळीचा तपास ग्रामीण पोलिस करत असताना युनिट चारच्या पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली. राम नवमी दिवशी खडकी येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आले. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यासाठी आणलेली हत्यारे जप्त केली आहेत. यामध्ये दोन गावठी कट्टे, तीन काडतुसे, कायता, तलवार तसेच मोबाईल रोख रक्कम व एक कार असा एकूण पाच लाख 79 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खडकी येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना या आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होतील असे पोलिसांनी सांगितले आहे.