नवी दिल्ली | संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी आयोजित कार्यक्रमात रामनाथ कोविंद यांनी मुख्य न्यायाधीश जे एस खेहर यांच्याकडून भारताचे 14 वे राष्ट्रपति म्हणून शपथ घेतली. त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. तत्पूर्वी, पत्नीसह राजघाटावर जाऊन त्यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पण केली. शपथग्रहणानंतरच्या भाषणात कोविंद यांनी देशातील जनतेचे आभार मानले. यापश्चात राष्ट्रपती भवन येथील प्रांगणात सेनेच्या तिन्ही दलांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्याचबरोबर सेवानिवृत होत असलेल्या प्रणव मुखर्जींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
“मी एका छोट्याशा गावातून आलो आहे. मातीच्या घरात माझे पालनपोषण झाले. माझा प्रवास मोठा होता. मात्र हा प्रवास माझा एकट्याचा नसून देश आणि समाजाची ही कथा आहे. या महान देशातील 125 कोटी जनतेचे आभार मानून मी त्यांना नमन करतो. सर्वांच्या विचारांचा सन्मान करणे हे आपल्या लोकशाहीचे वैशिष्टय आहे. इथल्या संस्कृती व परंपरेचा सर्वांना अभिमान आहे. देशातील विविधता हीच आपली ताकद आहे.”
आम्ही खूप काही मिळवलेय; परंतु अजूनही खूप काही मिळवायचेय.
संपूर्ण जगात भारताचे महत्व वाढत असताना आमची जबाबदारीही वाढलीय.
देशासाठी अन्न पिकवणारा शेतकरी, देशाला संरक्षण देणारे सैनिक, पोलीस हे आमचे राष्ट्रनिर्माता आहेत.