रामनाथ कोविंद शनिवारी मुंबईत!

0

मुंबई – राष्ट्रपती निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद आपल्या प्रचारासाठी येत्या १५ जुलैला मुंबईत येत असून या भेटीत ते `मातोश्री’वर जाणार नाहीत, असे समजते. `मातोश्री’वर न जाता कोविंद शिवसेनेला आपण इतर सर्व मित्रपक्षांप्रमाणेच वागवत असल्याचे दाखवत असल्याने शिवसेनेच्या मतांबद्दल मात्र अनिश्चितता निर्माण झाली असल्याचे बोलले जाते.

रामनाथ कोविंद १५ जुलैला सकाळी मुंबईत येत असून या दौऱ्यात ते गरवारे क्लबमध्ये भारतीय जनता पार्टी तेसच रालोआमधल्या घटक पक्षांच्या खासदार व आमदारांची बैठक घेणार आहेत. शिवसेनाही रालोआचा घटक पक्ष आहे. पण, राष्ट्रपतीपदाच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने रालोआच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केले होते. याचे मुख्य कारण होते ते या उमेदवारांनी मातोश्री, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी पायधूळ झाडल्यामुळेच. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मराठी म्हणून तर प्रणब मुखर्जी यांना मित्र म्हणून बाळासाहेबांनी शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला होता. विजयानंतरही या दोन्ही उमेदवारांनी `मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांचे आभार मानले होते.

यावेळी रालोआ सत्तेत आहेत. रालोआच्या उमेदवारासाठी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे सहकार्य मागितले होते. मात्र, कोविंद यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जातीचे कार्ड वापरत असल्याचा जाहीर आरोप करत असहमती दाखवली होती. पण, रालोआत नसलेले बिजू जनता दल, जनता दल युनायटेड, वायएसआर काँग्रेस, अण्णाद्रमुक पक्षाचे दोन्ही गट अशा पक्षांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या मतांची भाजपाला गरज नाही हे ठाकरे यांच्या लक्षात आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनीही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. आताही कोविंद मातोश्रीवर न जाता आपल्याला शिवसेनेने मते दिली नाही तरी चालतील, हा संदेश देत असल्याचे बोलले जाते. मात्र, त्यामुळे शिवसेनेचे आमदार व खासदार कोविंद यांनी बोलाविलेल्या बैठकीला जाणार की नाहीत तसेच शिवसेना आयत्या वेळी कोणाला मतदान करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपानेही शिवसेनेला गृहित न धरता विरोधकांची मते फोडण्याची पुरेपूर तयारी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी कंबर कसल्याचे कळते.