नवी दिल्ली- स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपाल सध्या देशद्रोह आणि हत्येचा आरोपाखाली तुरूंगात आहे. आज त्यांच्याबाबत निर्णय होणार आहे. हिस्सार कोर्टामध्ये त्यांच्यावर सुनावणी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने हिस्सारमध्ये कडेकाट बंदोबस्त राबवण्यात आला आहे. तसेच कलम १४४ नुसार परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील इंटरनेटसेवाही ठप्प करण्यात आली आहे. सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही शहराच्या काही सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
सुनावणी दरम्यान २० हजार समर्थक कोर्ट परिसर, तुरूंग, टाऊन पार्क आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. समर्थकांनी हिसंक वळण घेऊ नये त्यासाठी प्रशासनाने आधीच सर्व उपाययोजना केली आहे. दोन हजार पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. पोलिसासह आरपीएफच्या पाच तुकड्यांनाही बोलवण्यात आले आहे.