योगी आदित्यनाथ यांचं उत्तर प्रदेशातील सरकार आज 77 दिवसांचं झालंय. या 77 दिवसांत उत्तर प्रदेश अनेक मुद्द्यांमुळे सतत बातमीत राहिलं. गोहत्यापासून रोमिओ स्कॉडपर्यंतचे मुद्दे या बातम्यांच्या अग्रस्थानी होते. योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारला प्रसार माध्यमांकडून मिळणारी ही प्रसिद्धी भारतीय जनता पक्षाच्या चिंतेची बाब बनली आहे. तसं त्यांनी जाहीरदेखील केलंय. उत्तर प्रदेश सरकार दलितविरोधी असल्याची प्रतिमा तयार झाली तर ते पक्षाला परवडणारं नाही, अशी भावना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्याच आठवड्यात बोलून दाखवली आहे. त्याच आठवड्यात दलितांशी निगडित एक महत्त्वाची घटना घडली. ज्यामुळे भाजपच्या चिंतेत अधिकच भर पडली. भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचा अध्यक्ष रावण चंद्रशेखर आझाद याला उत्तर प्रदेश पोलिसांनी हिमाचल प्रदेशातून अटक केली. या अटकेमुळे उत्तर प्रदेशातील जातीयवाद पुन्हा एकदा प्रसार माध्यमांच्या रडारवर आलाय. उत्तर प्रदेशातील दलितांवरील वाढते अत्याचार ही बाब भाजपसाठी सामाजिक चिंता असती, तर बात काही और असती. मात्र, ती राजकीय चिंता आहे, हे पटवून देण्यासाठी कोणत्याही पुराव्यांची आवश्यकता नाही… तसेच अयोध्या नगरीमुळे उत्तर प्रदेश ‘रामभूमी’ या नावानेही ओळखला जातो. याच रामभूमीमध्ये स्वत:च्या नावापुढे रावण ही उपाधी लावणारा चंद्रशेखर आझाद नावाचा तरुण दलितांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी संघटनेची स्थापना करतो, या दोन्ही गोष्टी परस्परांना सामाजिकदृष्ट्या विचारप्रवृत्त करणार्या आहेत…
भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचा संस्थापक रावण चंद्रशेखर आझाद याला सहारनपूरमध्ये घडलेल्या जातीय दंगलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आजघडीला उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्हा जातीय संघर्षाच्या आगीत धुमसतोय. इथल्या दलित आणि सवर्ण वर्गामध्ये हिंसा भडकली आहे. खरंतर या जातीय हिंसेचा घटनाक्रम हा काहीसा असा होता… सर्वात आधी भाजपचे खासदार राघव लखनपाल यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली. 20 एप्रिल 2017 या दिवशी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीदरम्यान मोठा राडा झाला. राड्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी एसएसपींच्या बंगल्यावर मोर्चा नेला. त्यामुळे तिथलं वातावरण अधिकच तंग झालं. या राड्यामागची सामाजिक पार्श्वभूमी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच ओळखली. त्यांच्या लक्षात आलं की, या दंगलीला दलित-मुस्लीम असा रंग देण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे त्यांनी लागलीच संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना निरोप पाठवला आणि या प्रकरणात शांतता बाळगायला सांगितली. यानंतर 5 मे 2017 या दिवशी त्याच परिसरात महाराणा प्रताप यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यानही मोठा राडा झाला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. जवळपास 20 ते 25 दलितांची घरे जाळण्यात आल्याच्या बातम्या देशभर पसरल्या. ही बातमी खरी होती. मात्र, घरे जाळण्याच्या या घटनेनंतर हा संघर्ष थेट दलित विरुद्ध सवर्ण असा झाला. यानंतर सहारनपूरच्या जवळपासचे म्हणजेच शामली आणि मेरठसारख्या जिल्ह्यांमध्येही या संघर्षाची आग पसरू लागली आणि या जिल्ह्यांनीही पेट घेतला.
या संघर्षामुळेच उत्तर प्रदेशात एका संघटनेचं नाव सर्वप्रथम ऐकायला मिळालं, ते म्हणजे भीम आर्मी एकता मिशन… अर्थात भीम आर्मी… एका 30 वर्षीय तरुणाने या संघटनेची बांधणी केली. हा तरुण केवळ कार्यकर्ता नाहीय तर तो पेशाने वकील आहे. अवघ्या दोन वर्षांत या तरुणाने स्थापन केलेल्या भीम आर्मी या संघटनेशी सहारनपूर आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांतील अनेक तरुण जोडले गेले. इतकंच नाही तर ते दलितांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी सज्ज झाले. सहारनपूरमध्ये भीम आर्मीने काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांना माघार घ्यावी लागली होती. यामुळे इथल्या दलितांच्या आत्मविश्वासात कमालीचा बदल झाला. ते आता दलितांच्या हिताविषयी, त्यांच्या सुरक्षेविषयी खुलेपणाने बोलू लागले आहेत.
आजघडीला भीम आर्मी या संघटनेचे जवळपास 15,000 हजार कार्यकर्ते कार्यरत असल्याचं सांगितलं जातंय. इतकंच नाहीतर पंजाब, हरियाणा, उत्तराखंडासह अन्य राज्यांमध्येही ही संघटना पोहोचली आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या भीम आर्मी संघटनेचा मूळ उदय झाला तो सहारनपूरमधील एएचपी महाविद्यालयात… एएचपी कॉलेजात एक प्रकरण घडलं… प्रकरण होतं जातीयवादाचं… एएचपी कॉलेजात सवर्ण वर्गातील मुलांचा मोठा भरणा होता. त्यामुळे या कॉलेजातील दलित विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वेगळी बाकं आणि पिण्यासाठी वेगळे पाण्याचे नळ ठेवण्यात आले होते. चंद्रशेखर आझाद हादेखील याच कॉलेजचा विद्यार्थी… त्याने सर्वप्रथम या जातीय व्यवस्थेविरोधात आवाज उठवला. या संघर्षापासूनच चंद्रशेखरवर खर्या अर्थाने सहारनपूर जिल्ह्याची नजर पडली… कॉलेजातील ही जातीय व्यवस्था नेस्तनाबूत केल्यानंतर चंद्रशेखरने तरुणांची एक संघटना बांधली. तीच ही भीम आर्मी…दलितांचे हित जोपासणे, त्यांंचे रक्षण करणे या मुख्य उद्देशाने भीम आर्मीची बांधणी करण्यात आली. याच मुद्द्यांसाठी चंद्रशेखरने तरुणांची ही संघटना बांधली आणि पाहता पाहता मोटारसायकल घेऊन सज्ज झालेली एक अख्खी फौज उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात उभी ठाकली. मोटारसायकलवर स्वार झालेले हे भीम आर्मीचे सैनिक दलितांवरील अत्याचाराची खबर मिळताच घटनास्थळी दाखल होऊ लागले आणि त्या अत्याचारांच्या प्रकरणाला वाचा फोडू लागले. अशा प्रकारे सहारनपूरमधील छुटमल नावाच्या गावात राहणारा चंद्रशेखर आझाद भीम आर्मीचा अध्यक्ष बनला…
गेल्या दोन वर्षांत भीम आर्मीने संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात आपलं मोठं नेटवर्क उभं केलं. मात्र, अद्याप भीम आर्मीचं हे लोण महाराष्ट्रात पोहोचायचं बाकी होतं… निळा शेला अंगावर पांघरून चंद्रशेखर आसपासच्या गावांमध्ये फिरू लागला… तिथल्या दलितांशी बोलू लागला. त्यांना संघटनेत सामील करून घेऊ लागला. चंद्रशेखर लोकांशी हस्तांदोलन करताना जय भीम असं म्हणतो आणि स्वत:च्या मोटारसायकलवर भीम आर्मी असं लिहितो… या गोष्टीही प्रामुख्याने तिथल्या लोकांना भावत होत्या… परिणामी, चंद्रशेखरच्या आसपासच्या गावांमधील घरांच्या दरवाजांवर भीम आर्मीचे स्टिकर दिसू लागले… सरकारी कार्यालयांमध्ये फेर्या माराव्या लागणार्या दलित समाजाची कामं आता भीम आर्मीमुळे अल्पावधीतच होऊ लागली. यामुळेही ही संघटना अगदी कमी काळात लोकांपर्यंत पोहोचली आणि प्रसिद्धही झाली. यामुळेच मोटारसायकलवर स्वार झालेला, स्मार्टफोन वापरणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जातीव्यवस्था न मानणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात भीम आर्मीकडे आकर्षित होऊ लागला.
खरंतर 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या भीम आर्मीने कोणत्याच राजकीय पक्षाला समर्थन अथवा पाठिंबा दिला नाही. मात्र, या निवडणुकीदरम्यान चंद्रशेखर सतत प्रसार माध्यमांशी बोलत होता. त्यांना मुलाखती देत होता. मात्र, त्यावेळी चंद्रशेखरला कोणीही गंभीरपणे घेतले नाही. निवडणुकीच्या काळात दलितांना सांगितलं जातं की, निवडणुकीच्या वेळी तुम्ही हिंदू आहात आणि निवडणुकीनंतर तुम्ही दलित आहात, अशा शब्दांत चंद्रशेखर मुलाखती देत होता. मात्र, त्याच्या म्हणण्याकडे तेव्हा सार्यांनी दुर्लक्ष केलं. आमची लढाई आरक्षण वाचवण्यासाठी आणि समान शिक्षणपद्धत लागू करण्यासाठी आहे, असं चंद्रशेखर आजही सांगतो…
चंद्रशेखरला आता अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या अटकेचे पडसाद अद्याप महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात उमटले नाहीत, याचंच राहून राहून आश्चर्य वाटतंय. चंद्रशेखर आणि त्याची भीम आर्मी या दोहोंची थिअरी नीट समजून घेणं इथल्या पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे… अन्यथा रामभूमीत जन्मलेल्या या रावणाचं कधी दहन होईल, हे सांगता येत नाही.
राकेश शिर्के – 9867456984