राममंदीरासाठी थेट अध्यादेश का काढत नाही!

0

शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

पुणे : एकीकडे राममंदीराचा निर्णय कोर्टाकडून अपेक्षित करत आहात. तर, दुसरीकडे राममंदीर होणारच अस म्हणताय. हे काय आहे? राममंदीर व्हायलाच पाहिजे. ते करण्यासाठी कोर्टबाजी न करता सरकारने थेट एक अध्यादेश काढावा. तसा अधिकारही सरकारला आहे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना नेते, विभागीय संपर्क नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडली. दरम्यान, तुम्हाला निवडणूकीसाठी 2019 पर्यंत राममंदीराचा घोळ घालायचा आहे का? त्यासाठीच हे चालले आहे का? अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली. खा. राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, रमेश कोंडे आदी यावेळी उपस्थित होते.

गुजरातेत मोदींच्या पायाखालची वाळू सरकली!
राममंदीराच्या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेना महत्वाचा पक्ष होता. मी स्वत: पाचवेळा कमिशन समोर साक्षीदार म्हणून गेलो आहे. एकीकडे कोर्टाकडून निर्णय अपेक्षित धरायचा. आणि दुसरीकडे राममंदीर होणारच अशी भूमिका घ्यायची. राममंदीर बांधायचे आहेच तर कोर्टबाजी न करता सरकारने थेट अध्यादेश काढावा. मात्र, हा घोळ निवडणुकीसाठी घालायचा आहे का? तसे असेल तर परत एकदा तिथे गोंधळ होईल, असा इशाही खासदार राऊत यांनी यावेळी दिला. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रचाराबाबत विचारले असता, गुजरात निवडणुकीसाठी मोदी स्वत: सभा घेतात. छोट्याछोट्या गोष्टी आणि भावनिकतेचे आवाहन करत मते मागतात. कारण, गुजरातचे विकास मॉडेल आता राहिलेले नाही त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. खरे पाहता पंतप्रधानांनी एवढ्या खालच्या स्तराला यायला नाही पाहिजे. त्यांनी दिल्लीत बसून राजकारण करावे आणि पंतप्रधानपदाचा सन्मान राखावा, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

पटोलेंचा राजीनामा सरकारविरोधातील उद्रेक
सरकारने जाहिरातींवर केलेल्या खर्चावरही खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, सरकार जाहिरातीशिवाय जनतेसमोर पोहोचू शकले नाही. कर्जमुक्तीची घोषणा केल्याबरोबर लगेचच वारेमाप जहिराती सुरु केल्या. मात्र, अद्याप कर्जमाफी केली नाही. काळा पैशाच्याबाबतीतही तसेच केले. कामे केली नसल्याने जाहिरांतीवर तीन हजार कोटींचा खर्च करावा लागला आहे. खासदार नाना पटोले यांनी मागील तीन वर्षांपासून शेतकर्‍याची भूमिका मांडली. शिवसेना ज्या भूमिकेसाठी भांडत होती, तीच भूमिका पटोले हे आपल्या पक्षात मांडत होते. त्यांच्या राजीनाम्यातून भाजप सरकार विषयीचा उद्रेक दिसत आहे. विदर्भाची भावना काय आहे, हे त्यांच्या राजीनाम्यातून स्पष्ट होत आहे. विदर्भाला प्रस्थापितांविरोधात बंडाची मोठी परंपरा आहे. ही भूमिका पटोलेंनी पुढे नेली तर नक्कीच ते विदर्भसिंह ठरतील, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी आता पूर्वीसारखे पप्पू राहिले नाहीत!
काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी आता पूर्वीसारखे पप्पू राहिले नाहीत, हे गुजरातमधील निवडणूक प्रचारावरून स्पष्ट होत आहे. ते आता नेते बनले आहेत. 2014 च्या निवडणुकीवेळी राहुल गांधी यांचे भाषण लागले की लोक चॅनल बदलत होते. मात्र, आता नागरिक त्यांचे भाषण ऐकत आहेत. आधी वाटायचे राहुल गांधी पंतप्रधान होवू शकत नाही. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, असे खासदार संजय राऊत यांनी नमूद कले.