रामवाडी कचरा प्रकल्पाचे काम बंद

0

हडपसर । सत्ताधारी भाजपने नागरिकांना विश्वासात न घेता रामटेकडी येथे गुपचूप सुरू केलेले कचरा प्रकल्पाचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आंदोलन करीत बंद पाडले. कचरा प्रकल्प परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे हडपसरमध्ये पुन्हा एकदा कचर्‍याचा प्रश्‍न पेटण्याची चिन्हे दिसत असून, सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

मेसेज सोशल मीडियावर
तरीही प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला शनिवारी सकाळी या कचरा प्रकल्पाचे काम बंद पडल्याचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी तिकडे हातातील कामे टाकून धाव घेतली होती. त्यानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करावा, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे जनतेचा रेटा पाहता सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन करतील असे मत व्यक्त केले जाते आहे.

तोपर्यंत काम करू देणार नाही
महापालिका अधिकार्‍यांनी मात्र प्रकल्पाचे काम सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे उरुळीचा अनुभव पाहता नागरिक आणि प्रशासनाचा संघर्ष होण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. या कचरा प्रकल्पामुळे नागरिकांच्या जीविताला धोका असताना राजकीय स्वार्थासाठी हडपसरच्या भाजपच्या नगरसेवकांनी मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरसेवक ससाणे यांना फोन करून काम सुरू करून देण्यास सांगितले तेव्हा येथील नागरिकांशी आपण चर्चा करावी व होणारा विरोध लक्षात घ्यावा तोपर्यंत काम करू देणार नाही. याविषयी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ससाणे यांनी दिला. यावेळी माजी आमदार महादेव बाबर, सुनील बनकर व नागरिक उपस्थित होते.

भाजपचा हट्ट कायम
रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे सत्ताधारी भाजपने कचरा प्रक्रिया प्रकल्प करण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पास राष्ट्रवादीचे नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांनी आधीपासून प्रखर विरोध केला आहे. तरी या कचरा प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा हट्ट भाजपने कायम ठेवला आहे. याकरीता काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन ठेवले होते; पण योगेश ससाणे यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याने मुख्यमंत्री फिरकले नव्हते; याप्रकरणी भाजप सत्ताधारी तोंडघशी पडले होते.

आमदारांचाही विरोध
रामटेकडी येथे साकारणारा कचरा डेपो नाही तर कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे, या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आयुक्त कुणाल कुमार, महापौर मुक्ता टिळक यांच्या समवेत बैठक घेतली जाईल. यावेळी नगरसेवक, विरोधी पक्षनेते व नागरिक प्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. जर नागरिकांच्या जीविताला धोका असेल तर आमदार म्हणून आमचा विरोध आहे. पालिकेत सत्ता आमची असली तरी नागरिकांच्या विरोधात जाऊन प्रकल्प राबविले जाणार नाहीत, पालकमंत्र्यांशी बोललो आहे, नागरिकांच्या आरोग्याला धोका होत असेल तर आमचा विरोध राहील याकरिता लवकरच सर्वांची बैठक घेणार आहे. नागरिकांना मागील अनुभव वाईट आहे. त्यामुळे कचरा प्रकल्पास विरोध केला जात आहे. पुणेकरांनी आम्हाला पालिकेत सत्ता दिली नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने प्रकल्प राबविण्यात येईल. विश्वास दाखविला आहे हडपसर पुणे शहराचा भाग आहे त्यामुळे जनहिताचे प्रकल्प साकारणार आहे.
– योगेश टिळेकर, आमदार, हडपसर विधानसभा

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न
या प्रकल्पामुळे परिसरातील सर्व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. प्रशासनाने हा प्रकल्प थांबविला नाही, तर प्रसंगी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (दि.17) हडपसर मारुती मंदिरात सकाळी ठीक 11 वाजता या नवीन कचराप्रकल्पाला विरोध करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कचरा प्रकल्पाचे काय करायचे याचा निर्णय होणार आहे.
– योगेश ससाणे, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक

लोकहिताची भूमिका घ्यावी
हडपसर येथील कचरा डेपोला सर्वपक्षीय एकत्र येण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी याविरोधात पवित्रा घेतलाच आहे, पण त्याला आता आंदोलनाची धार देण्याची गरज आहे. नाहीतर हे मुख्यमंत्री त्यांचा हट्ट पूर्ण करण्याच्या मन:स्थितीत दिसत आहेत. जनतेवर निर्णय लादण्याचेच या सरकारने ठरविलेले दिसते. योगेश टिळेकरे, दिलीप तुपे यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी काम केले आहे. भाजपची सत्ता नसतानाही कमळ शर्टला लावून तुमचा प्रचार केला आता लोकांचे मत घ्यावे
आणि आमदार योगेश टिळेकर यांनी लोकहिताची भूमिका घ्यावी.
– हेमंत ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते

कचरा प्रकल्प चारीबाजूला हवा
महापालिकेला कचरा प्रकल्प करायचा असेल तर शहरातील चारीबाजूला करावा. सर्व घाणीचे प्रकल्प हडपसरलाच का? आम्ही कचरा प्रकल्प होऊ देणार नाही. रामटेकडी कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक, स्थानिक नागरिकांसोबत मोठे आंदोलन घेणार आहोत.
– महादेव बाबर, माजी आमदार, हडपसर

सर्व नागरिकांनी बैठकीस यावे
महापालिका पुढे कचरा डेपो बनवण्याचे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कचरा डेपोसाठी शहरात कुठे जागा मिळत नसल्याने महापालिकेने हडपसराला कचरा सिटी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही गप्पा बसणार नाही, गांधी चौक हडपसर गाव येथे बैठक घेण्यात येणार आहे, सर्व नागरिकांनी बैठकीस यावे. नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सत्ताधार्‍यांचा हा प्रकल्प निर्मितीचा घाट हाणून पाडला पाहिजे. त्यासाठी उद्या होणार्‍या बैठकीस उपस्थित राहावे.
– सुनील बनकर, माजी नगरसेवक