रामानंदनगरात चार दुकाने फोडली

0

जळगाव । शहरातील रामानंदनगर बसस्टॉप जवळील चार दुकाने फोडून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना सोमवारी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, साडीच्या दुकानातून किरकोळ रक्कम व दोन साड्या चोरट्यांनी लांबविल्या आहेत. तर अन्य तीन दुकानात काही न मिळाल्याने चोरटे खाली हात परतले. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी टॉमीच्या सहाय्यने शटर उचकवून चोरट्यांनी चोरी केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले. यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोबारा केल्याची घटणा आज सकाळी 5:30 वाजता उघडकीस आली आहे.

रामानंदनगर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
रामानंदनगर बसस्टॉप चौकात अतुल बोरसे यांचे कमल मेडीकल, सुजाता अविनाश कुळकर्णी यांचे अविनाश बुक डेपो, प्रतिभा साहेबराव पाटील यांचे प्रतिभा साडी सेंटर तर डॉ. मिलींद समनपुरे यांचा दवाखाना आहे. असे एका लाईनतच चार दुकाने आहेत. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी टॉमीच्या सहाय्याने शटर उचकवून तसेच कुलूप तोडून चारही दुकानांमध्ये प्रवेश करत चोरी केली. यानंतर पोबारा केला. सोमवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्याने तात्काळ रामानंदनगर पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. पोलीसांनी घटणास्थळी भेट देऊन चौकशी केली असता चोरीचा प्रयत्न केला असल्याचे प्रथम दर्शनीय दिसत होते. यानंतर दुकान मालकांना देखील बोलविण्यात आल्यानंतर तीन दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तर प्रतिभा पाटील यांच्या प्रतिभा साडी सेंटर या दुकानातून चोरट्यांनी आठशे रूपये व दोन साड्या चोरून नेल्याचे समोर आले. पोलिसांकडून परिसराची पाहणी करून घटनेची माहिती घेण्यात आली. यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बसस्टॉपवर एक पोलीस चौकी सुध्दा असुन भर चौकांत चोरांनी चार दुकानांचे कुलुप तोडून पोलीसांना एक आवाहन दिले आहे. दरम्यान यामुळे परिसरातील नागरीकांन मध्ये घबराट निर्माण झाली आहे.