जळगाव। रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गस्तीवर असतांना एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी व दोघांचे मोबाईल लांबविणार्या चोरट्यास ताब्यात घेऊन अटक केली. राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी उर्फ सिकलकर (वय 22 रा.राजीवगांधी नगर, जळगाव) असे चोरट्याचे नाव असून राणासिंग याने एक किराणा दुकान, मंदिराची दान पेटी फोडली आहेत. तर दोन मुलांचे मोबाईल लांबविले होते. हा सर्व मुद्देमाल त्याच्याकडून रामानंदनगर पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गस्तीदरम्यान संशयितरित्या फिरतांना आढळला
श्रद्धा कॉलनी परिसरात शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास संशयीत फिरत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद भोळे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी गोपाल चौधरी, विलास शिंदे, सुरेश मेढे, सागर तडवी, ज्ञानेश्वर कोळी, भावसार यांना श्रद्धा कॉलनी परिसरात कोंबींग ऑपरेशन करण्यासाठी पाठविले. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पथकाच्या कोंबींग ऑपरेशन दरम्यान शिवनेरी नगरात राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी (वय 22, रा. राजीव गांधीनगर) हा सराईत गुन्हेगार संशयीतरीत्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक टॅमी, बॅटरी अशा घरफोडी करण्याच्या वस्तू आढळल्या. तसेच इमिटेशन ज्वेलरी, काही पैसेही त्याच्याकडे सापडले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
या ठिकाणी केल्या चोर्या..
राणासिंग याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याला खाकी हिसका दाखविला असता सुरुवातीला नकार देणारा राणा पोपटासारखा बोलू लागला. त्याने शिवनेरीनगरातील सुभाष पर्वत अहिर (वय 45, रा. योजना अपार्टमेंट) यांच्या मालकीच्या श्री किराणा स्टोअर्सच्या शटरचे लॉक तोडून इमिटेशन ज्वेलरी तसेच काही पैसे असा एकूण 4 हजार रुपयांचा ऐवज चोरले. त्यानंतर चोरट्याने श्रद्धा कॉलनीतील महादेव मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुटेपैसे चोरले. त्यानंतर राणासिंग जुन्नी याने गिरणा पाण्याच्या टाकीकडे मोर्च वळवला. त्या ठिकाणी गोपाळ नावाच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या वॉचमनच्या घरातून त्याच्या लहान मुलाच्या हातातील चांदीचे कडे काढून घेतले. तसेच बाजुच्या बांधकामावरील बंजारा नावाच्या वॉचमनच्या झोपडीतून एक मोबाइल राणासिंग याने लंपास केला. त्यानंतर तो पहाटे 4 वाजेच्या सुमारास पुन्हा शिवनेरी कॉलनीत चोरी करण्यासाठी जागा बघत होता. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे त्याचे नियोजन फसले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला सर्व ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणीचा तपास सहायक फौजदार गोपाळ चौधरी तपास करीत आहेत.