जळगाव । अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असतांनाही शहरातील रामानंद नगर-गिरणा पंपींग रोड या मार्गावरुन अवजड वाहनांची वाहतुक सुुरु असल्याने पाईप लाईनला गळती लागण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पाणी पुरवठा करण्यात व्यत्यय येत आहे. अपघाताच्या शक्यतेनेे या मार्गावरील अवजड वाहतुक तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी महापौर ललित कोल्हे यांनी पोलीस अधीक्षक व शहर वाहतुक शाखेकडे केली.
मनपाचे आर्थिक नुकसान
या मार्गावर तसेच रस्त्याला लागून महापालिकेच्या जलवाहिनीचे जाळे असुन अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या जलवाहिन्यांना सतत गळती होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा व वितरण व्यवस्थेत व्यत्यय येत आहे. तसेच गळती दुरुस्तीमुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र गळत्यांमुळे रस्त्यावर पसरणार्या पाण्यामुळे नागरीकांना वाहतुक करणे जिकरीचे ठरत असल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
सूचना फलकाकडे दुर्लक्ष
या मार्गावरील अवजड वाहतुक बंद करण्यात आलेली असून तसा फलक देखिल या रस्त्यावर लावण्यात आलेला आहे. मात्र रस्त्यावरुन वाळु वाहतुक करणार्या अवजड वाहनांची वाहतुक सर्रासपणे सुरु आहे. या वाहनाच्या सुसाट वेगामुळे प्रसंगी अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखिल उद्भण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले.