जळगाव । छत्तीसगढचा स्मृतीभंश झालेला तरूण शहरातील आकाशवाणी चौक येथे मागील आठवड्यातील शनिवारी फिरत असतांना रामानंदनगर पोलिसांना आढळून आला होता. त्यास पोलिस ठाण्यात घेवून जात पोलिसांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्याला आठवत असलेला नंबर क्रमांक त्याच्याजवळून मिळवला आणि कुटूंबियांना तरूणाची माहिती दिली. आज बुधवारी तरूणाच्या कुटूंबियांनी जळगावात येवून रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठले. त्यावेळी आपल्या मुलाला पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाअश्रू बाहेर पडत होते. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याने तरूणाला कुटूंबिय पुन्हा मिळाल्याने खाकीतली माणुसकी पाहण्यास मिळाली.
गस्तीदरम्यान सापडला होता तरूण
रामानंदनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी, विलास शिंदे, विजय खैरे आदी पोलिस कर्मचारी शनिवारी 26 ऑगस्ट रोजी आकाशवाणी चौकात गस्त घालीत असतांना स्मृतीभ्रंश झालेला तरूण मिळून आला होता. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने शंभू सुकलाल चौहाण (वय-28 रा. तुंबला ता. फरसाबहार, जि. जशपुर. छत्तीसगढ) असे नाव व पत्ता सांगितला. यानंतर त्याला गाडीत बसवून पोलिस ठाण्यात घेवून जात शंभू याची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यानंतर त्याने एक मोबाईल क्रमांक पोलिसांना सांगितला. गोपाल चौधरी, विलास शिंदे, विजय खैरे यांनी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर कुटूंबियांना शंभू हा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती दिल्यानंतर आम्हीच गेल्या दहा ते बारा दिवसांपासून त्याचा शोध घेत असल्याचा कुटूंबियांनी पोलिसांना सांगितले. परंतू, मुलगा सापडल्याने कुटूंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. मंगळवारी 30 ऑगस्टला सकाळीच 9.30 वाजता शंभू याच्या चुलत भाऊ खुलनराम चेंगेश्वर चौहाण यांनी तुंबला येथून शहरात येवून रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठले. यानंतर आपला भाऊ मिळाल्याने खुलनराम यांच्या डोळ्यातून आनंदाअश्रू निघाले. भाऊ मिळाल्यानंतर खुलनराम यांनी पोलिसांनी केलेल्या सहकार्याला सलाम ठोकला. त्यामुळे पुन्हा खाकीतली माणुसकी जळगावकरांना पाहण्यास मिळाली आहे.