जळगाव ।सोमवारी धुलिवंदनाच्या दिवशी सुप्रिम कॉलनी, रामेश्वर कॉलनी व मानस हॉटेल परिसर या तीन ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौकात पवन सोनवणे या तरुणाचे वाढदिवसाचे बॅनर फाडल्याच्या कारणावरुन संध्याकाळी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर याच कारणावरुन महामार्गावरील हॉटेल मानस जवळही दोन गटात वाद झाले. तर सुप्रीम कॉलनीतील श्रीकृष्ण नगरात दुपारी एका कुटूंबाच्या घरावर दगडफेक करुन सामानाची नासधूस करण्यात आली.
रामेश्वर कॉलनीत आदिती हॉटेलजवळ पवन सोनवणे याच्या वाढदिवसाचे बॅनर लावलेले होते. ते बॅनर काही तरुणांनी फाडले. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे गणेश किसन सोनवणे हे जाब विचारण्यासाठी गेले. त्या वेळी गणेश अर्जून कोळी, मनोज अनिल सपकाळे, सागर पंडीत बाविस्कर (वय 21, रा. मेस्कोमाता नगर), ललित कोळी आणि एक अज्ञात तरुणाने गणेश सोनवणेंसह एकाला धक्काबुक्की करून मारहाण केली. यावेळी 400 ते 500 जणांचा जमाव या चौकात जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, रामकृष्ण पाटील, अशरफ शेख व सहकाजयांनी घटनास्थळी धाव घेवून जमाव पांगविला. याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पोलिसांनी गणेश कोळी, सागर बाविस्कर, मनोज सपकाळे यांना मंगळवारी अटक करून न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सुप्रीम कॉलनीत घरावर हल्ला
जखमी तरुणाला रिक्षातून दवाखान्यात का नेले या कारणावरुन सुप्रीम कॉलनीतील श्रीकृष्ण नगरात कविता मोहन परदेशी (वय 40) या महिलेच्या घरात घुसून दगडफेक केली व सामानाची नासधूस केल्याप्रकरणी विनोद उर्फ चेतन राजपूत, देविदास गोरे, सनी जाधव, पवन महाले (सर्व रा.खुबचंद साहित्या नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनी 12 मार्च रोजी रात्री विजय गुलाब जाधव या तरुणाला मारहाण केली होती. जखमी अवस्थेत त्याला कविता परदेशी व काही जणांनी रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.त्याचा राग आल्याने या चौघांनी परदेशी यांच्या घरावर हल्ला केल्याचे सहायक फौजदार राजाराम पाटील यांनी सांगितले. दरम्यान, संशयितांना अद्याप अटक केलेली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.