रामोशी समाजाच्या मागण्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापणार : गिरीश बापट

0

भिवडीमध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 226 वी जयंती उत्साहात साजरी

सासवड । उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून देश मुक्त केला. मात्र, त्यांना फाशी दिल्यानंतर ब्रिटिशांनी उमाजी नाईक यांनाच चोर ठरविले. त्यामुळे 226 वर्षे त्यांना न्याय मिळू शकला नाही. आता त्यांना न्याय मिळाला असून त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच रामोशी समाजाच्या मागण्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाईल. त्या माध्यमातून नोकरी, उद्योग, व्यवसाय आदींसाठी पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 226 वी जयंती साजरी करण्यात आली. यंदा पहिल्यांदाच शासनाच्या वतीने त्यांची जयंती साजरी करण्यात आली. जलसंधारण राज्यमंत्री राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मनसेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दौलत शितोळे, राजे उमाजी नाईक यांचे वंशज रमण खोमणे आदी मान्यवरांसह हजारो समाज बांधव आणि कृती समितीचे अधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदेंनी विरोधकांना फटकारले
आतापर्यंतच्या सरकारला उमाजी नाईक यांची उंचीच समजली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही ते उपेक्षित राहिले. अशा शब्दात राम शिंदे यांनी विरोधकांना फटकारले. तसेच समाजाने पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले. रामोशी समाजाचा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जातीमध्ये सामावेश केल्याने आतापर्यंत हा समाज शासकीय योजना आणि नोकरीपासून वंचित आहे. त्यामुळे एकाच जातीमध्ये त्यांचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले. शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामुळे समाजाला न्याय देणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

गिळंकृत केलेल्या जमिनी परत मिळवून द्या
रामोशी समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बेडर-बेरड कृती समितीचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी शासनाचे आभार मानले. तसेच धनदांडग्यांनी समाजाच्या जमिनी गिळंकृत केल्या असून त्या परत विनाअट मिळवून द्याव्यात, खडकमाळ येथील उमाजी नाईक यांच्या स्मारकाला कोणताही धक्का न लावता मेट्रो प्रकल्प उभारावा व त्यास उमाजी नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे त्यांच्या वंशजांची सुमारे 1800 एकर जमीन हडपण्यात आल्याने आता त्यांच्याकडे जमीन नाही. त्यामुळे ती जमीन परत करण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा, असेही निदर्शनास आणून दिले. मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ज्येष्ठ नेते बबनराव खोमणे, मोहन मदने, संजय जाधव, अनंता चव्हाण यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रामदास धनवटे यांनी केले. गंगाराम जाधव यांनी आभार मानले.