मुंबई: ‘घर फिरले की घराचे वासे फिरतात’ ही म्हण सध्याच्या काळात भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर तंतोतंत लागू होत आहे. दहीहंडीच्या जाहीर कार्यक्रमात ‘मुलींना पळवून आणून देईल’ असे अतिशय संतापजनक वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांच्यावर सर्व स्तरांतून जोरदार टीका होत असताना त्यांनी पुन्हा वाद ओढवून घेतला आहे. कॅन्सरवर अमेरिकेत उपचार सुरु असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचे निधन झाल्याची अफवा त्यांनी ट्विटरवरून पसरवली असल्याचे समोर आले असून आपली चूक लक्षात येताच ते ट्विट त्यांनी मागे घेतले आहे. दरम्यान कदम यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठली असून बॉलिवूडसोबतच मराठी कलाकारांकडून त्यांचा निषेध केला जात आहे.
चूक लक्षात येताच ट्विट मागे
हे देखील वाचा
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर सध्या अमेरिकेत उपचार सुरु असताना तिला ट्वीटरवरून चक्क श्रध्दांजली वाहण्याचा नवा पराक्रम कदम यांनी केल्याने राम कदम पुन्हा चर्चेत आले आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना कँन्सर असून त्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणाही होत आहे. तरीही राम कदम यांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करत त्यांना श्रध्दांजली वाहून मोकळे झाले आहेत. कदम यांच्या या ट्वीटमुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, चुकीचे ट्वीट केल्याने प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठताच राम कदम यांनी केलेले ट्वीट मागे घेत दुसरे ट्वीट करत अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांची प्रकृत्ती सुधारावी यासाठी प्रार्थना केली.
– ‘दरबार’च्या नावावर इमेज बिल्डिंगचा प्रयत्न
दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरून तितक्याच मुजोर पध्दतीने माफी मागितल्यानंतर राम कदमांनी इमेज बिल्डिंग करायला देखील सुरुवात केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून राम कदमांनी आपण किती सोशल वर्क करतो याबाबत व्हिडियो अपलोड करायला सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विषयक समस्याच असलेल्या नागरिकांचे कदमांची यासाठी कशी मदत झाली याबाबत व्हिडियो पोस्ट केले जात आहेत. यामध्ये काही मोफत असलेल्या वैद्यकीय सेवा देखील राम कदमांमुळेच मिळाल्या अशा प्रकारे वदवून घेत प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.