मुंबई-दहीहंडी कार्यक्रमात भाजपा आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान आमदार कदम यांच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा याबाबत पोलिसांनी कायदेतज्ज्ञांचे मत मागवले आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात राम कदमांविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. मनसेच्या वतीने पुरावा म्हणून राम कदम यांच्या भाषणाची क्लिपही सादर करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात आता कायदेतज्ज्ञांचे मत मागवले आहे. ‘घाटकोपर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने राज्याच्या विधी विभागातील कायदे तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे. राम कदमांवर कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करता येईल याबाबत आम्ही मत मागवले आहे’, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते. राम कदम यांच्या विधानावरुन चोहोबाजूंनी टीका होत आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध महिला संघटनांनी राम कदम यांचा निषेध केला आहे.