राम गणेश गडकरींना अभिवादन करणार्‍या कार्यकर्त्यांना रोखले

0

पुणे । राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आहे संभाजी बागेतील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी रोखले. हे कार्यकर्ते मंगळवारी सकाळी उद्यानात जाण्याच्या प्रयत्नात असताना उद्यान निरीक्षकाने त्यांना आत जाण्यापासून रोखले आणि पोलिसांना बोलावले. दरम्यान गडकरींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यापासून आम्हाला का रोखले जाते, असा सवाल उपस्थित करत महिनाभरात गडकरींचा पुतळा बसवावा अन्यथा ब्राम्हण महासंघ स्वतः हा पुतळा बसवेल असा इशारा देण्यात आला आहे.

पुतळा बसवण्याची मागणी
गेल्या वर्षी संभाजी बागेतील गडकरींच्या पुतळ्याची समाजकंटकांनी तोडफोड करत उद्यानापाठीमागे असणार्‍या नदीत पुतळा फेकून दिला होता. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटकही केली होती. या घटनेनंतर पुण्यातील राजकारणही तापले होते. संभाजी ब्रिगेडने गडकरींच्या पुतळ्याला विरोध करत त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती.

महापौरांनी आश्‍वासन पाळले नाही
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष विश्‍वजीत देशपांडे यांनी बोलताना, गडकरींना अभिवादन करण्यासाठी कुणाची परवानगी घेण्याची अवशक्यता नाही. झाला तो प्रकार दुर्देवी आहे. महापौरांनी वर्षभरात पुतळा बसवण्याची घोषणा केली होती. अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. महापालिकेने महिनाभरात पुतळा बसवण्यासंबंधी कार्यवाही केली नाही ते ब्राह्मण महासंघ स्वतः पुतळा बसवेल, असा इशारा त्यांनी दिला.