राम मंदिराचे आंदोलन विहिंप, संघामुळे कमकुवत

0

द्वारका पीठाच्या शंकराचार्यांचा गंभीर आरोप

अलाहाबाद : राम मंदिराचे आंदोलन कमकुवत करण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचा हात आहे, असा गंभीर आरोप द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केला आहे. राम मंदिराला लावण्यात आलेले कुलुप माझा सल्ला घेऊन दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी उघडले होते. तसेच राम मंदिर उघडल्यावर विश्व हिंदू परिषदेने विजय यात्रा काढली. ज्यामुळे मुस्लिम बांधव नाराज झाले. राम मंदिराच्या निर्मितीवर आम्ही ठाम आहोत. रामाचे मंदिर हे त्याच्या जन्मस्थळावरच निर्मिले जाईल असेही शंकराचार्यांनी म्हटल्याने विहिंप, संघ कात्रीत सापडले आहेत.

सगळी जमीन रामलल्लाचीच
वरूपानंद सरस्वती यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, स्कंद पुराणात रामजन्मभूमी असल्याचे दाखले आहेत. हे दाखले आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुरावे म्हणून सादर करू. आमची संस्था राम जन्मभूमीच्या पुनर्निर्माणासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल. ज्या जागी रामलल्ला विराजमान आहेत ती जागा रामजन्मभूमीच आहे. ज्या जागेवरून वाद सुरु आहे तिथे मशिद कधीच नव्हती. अलाहाबाद हायकोर्टाने फक्त 33 टक्के भाग मुस्लिमांना दिला आहे. बाकीची जागा ही राम जन्मभूमी आणि निर्मोही आखाड्याला दिली आहे. मात्र ही सगळीच्या सगळी जमीन रामलल्लाचीच आहे. या परिसरात मशिदीची निर्मिती झाली तर वाद मिटणार नाहीच. त्यापेक्षा मशिदीची जागा बदलण्यात यावी. राम जन्मभूमीचे आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांनी कमकुवत केले असा आरोप त्यांनी केला.

…तरच वाद मिटेल
माझी भूमिका मुस्लिम विरोधी अजिबात नाही. मात्र माझा सल्ला त्यांनी ऐकायला हवा, राम मंदिर परिसरात किंवा त्या मंदिराच्या आसपास मशिद बांधण्यात आली तर हिंदू-मुस्लिम वाद संपणार नाही, उलट सुरुच राहिल. त्याउलट मुस्लिम बांधवांनी जर दुसर्‍या जागेवर मशिद बांधली तर हा वाद मिटण्यास मदत होईल.
-स्वरूपानंद सरस्वती