हैद्राबाद : उत्तर प्रदेशातील राम मंदिराच्या उभारणीबद्दल भाजपच्या आमदाराने प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधान केले आहे. राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणार्यांचा शिरच्छेद करु, असे चिथावणीखोर वक्तव्य भाजपचे गोशामहलचे आमदार राजा सिंग यांनी केले आहे. हैदराबादमधील एका जनसभेत बोलताना राजा सिंग यांनी हे विधान केले आहे. अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती केल्यास परिणामांना सामोरे जा, असा इशारा काहीजण देतात. आम्ही तुमच्या याच विधानाची वाट पाहत आहोत. यानंतर आम्ही तुमचा शिरच्छेद करू, असे धक्कादायक विधान राजा सिंग यांनी केलो आहे.
राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली होती. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. अद्याप या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिलेला नाही. दोन्ही पक्षकारांनी याप्रकरणी न्यायालयाबाहेर तोडगा काढावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. याप्रकरणी मध्यस्ती करण्याची तयारीदेखील सर्वोच्च न्यायालयाने दाखवली. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 14 जणांवर खटला सुरु आहे.