मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला आहे. राम मंदिरासाठी आता कायदा झाला नाही तर पुन्हा कधीच होणार नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. राम मंदिरासाठी आज कायदा बनवला जात नसेल तर तो पुन्हा कधीच बनला जाणार नाही. आज आपल्याकडे बहुमत आहे. २०१९ मध्ये काय होईल हे आज सांगता येत नाही. हा श्रद्धेचा विषय असल्याने न्यायालयात त्यावर तोडगा निघेल असे वाटत नाही. हा राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राजकीय इच्छाशक्ती दाखवून हा प्रश्न सोडवू शकतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
यावेळी राऊत यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीका केली. असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद पर्यंतच मर्यादित रहावं. राम मंदिर अयोध्येत बांधलं जाणार आहे. हैदराबाद, पाकिस्तान आणि ईराणमध्ये बांधलं जाणार नाही, अशी टीका करतानाच ओवेसींसारखे लोक मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत, त्यामुळे या समाजाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, असंही राऊत म्हणाले.