राम मंदिरासाठी पहिले दान केंद्र सरकारकडून; दिले इतके पैसे !

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुधवारी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये १५ सदस्य असतील. यात ९ कायमस्वरुपी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत. या विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा केंद्र सरकारने या विश्वस्त मंडळाला दान दिले आहे. १ रुपयाचे रोख दान केंद्र सरकारने दिले. या विश्वस्त मंडळाला मिळालेले हे पहिले दान आहे. विश्वस्त मंडळाला केंद्र सरकारच्या वतीने हे दान गृह मंत्रालयाचे अवर सचिव डी. मुर्मू यांनी दिले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मितीच्या दिशेने काम सुरू व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने विश्वस्त मंडळाला १ रुपयांचे दान देत दानाची सुरुवात केली आहे.

विश्वस्त मंडळ स्थावर मालमत्तेसह विनाअट कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही स्वरुपात दान, अनुदान, अंशदान आणि योगदान घेऊ शकणार आहे. सुरुवातीच्या काळात हे विश्वस्त मंडळ ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरण यांच्या घरामधूनच काम करणार आहे. मात्र, त्यानंतर विश्वस्त मंडळाचे कामयस्वरुपी कार्यालय सुरू करण्यात येईल. या विश्वस्त मंडळाला राम मंदिर निर्माण आणि संबंधीत विषयांवर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे अधिकार असणार आहेत. विश्वस्त मंडळाचे नोंदणीकृत कार्यालय दिल्लीत असणार आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ केशवन अय्यंगार परासरण विश्वस्त मंडळात असतील. या विश्वस्त मंडळात जगतगुरू शंकराचार्य, जगतगुरू माधवानंद स्वामी, युगपुरुष परमानंदजी महाराज हे देखील सदस्य असणार आहेत. या व्यतिरिक्त पुण्याचे गोविंददेव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल आणि निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास यांच्या नावांचा देखील समावेश आहे.