नवी दिल्ली: ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. अयोध्यामध्ये दिवाळीसारखी तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. बहुप्रतीक्षित राम मंदिर होण्याचे श्रेय मोदी सरकारला दिले जात आहे. मात्र भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे योगदान काहीच नसल्याचे खळबळजनक विधान केले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीवर त्यांची मुलाखत सुरु होती. त्यात त्यांनी हे विधान केले आहे. राम मंदिरासाठी राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचे योगदान आहे असे विधान त्यांनी केले आहे.
दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये अडथला आणला होता असे खळबळजनक विधानही त्यांनी केले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी “राम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती. राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याबाबतची फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या 5 वर्षांपासून पडून आहे. मात्र त्यांनी यावर स्वाक्षरी केलेली नाही. मी कोर्टात जाऊन यावर आदेश मिळवू शकतो. पण मला वाईट वाटतंय की आमचा पक्ष असतानाही आम्हाला कोर्टात जावं लागत आहे” असे सांगितले आहे.