राम मंदिर ट्रस्टची आज पहिली बैठक !

0

नवी दिल्ली: अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टची पहिली बैठक आज संध्याकाळी ५ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिर ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू वासुदेवानंद सरस्वती यांनी सांगितले की, २ एप्रिल रामनवमी आहे. ६ एप्रिलला महावीर जयंती आणि हनुमान जयंती आहे. या दोन्ही दिवशी जर शुभ मुहूर्त नाही मिळाला तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राम मंदिर बांधण्याची सुरूवात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सर्वानुमते राम मंदिर बांधण्याची तारीख निश्चित होणार आहे.

ट्रस्टच्या बैठकीपूर्वी विश्व हिंदू परिषद कार्यालयात ट्रस्टचे सर्व सदस्य सभेसाठी जमणार आहे. यानंतर हे लोक थेट संध्याकाळी पाच वाजता रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयात पोहोचतील आणि तेथील पहिल्या सभेत भाग घेणार आहे. पुन्हा राम मंदिर बांधण्यासाठी पायाभरणीची गरज नसल्याचे ज्योतिष पीठचे शंकराचार्य आणि रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य वासुदेवानंद सरस्वती यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

शंकराचार्य जगद्गुरू वासुदेवानंद सरस्वती म्हणाले, ‘मंदिराच्या बांधकामासाठी पायाभरणी आधीच झाली आहे आणि पायाभरणी करणारे महेंद्र चौपाल हेदेखील या ट्रस्टचे सदस्य आहेत. वेगळा पाया घालण्याची गरज नाही. परंतु त्या जागेची पूजा केली जाऊ शकते. वासुदेवानंद सरस्वती पुढे म्हणाले की, मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू झाले पाहिजे. मंदिराची पहिली वीट दलित, महात्मा, शेतकरी किंवा राजकीय नेत्यांच्या हस्ते रचण्याची शक्यता आहे. या बैठकीत राम मंदिर बांधण्याच्या पुढील काही दिवसांचा अजेंडा देखील निश्चित केला जाणार आहे.