रायगडमधील चार तालुके पूर्णपणे हागणदारीमुक्त

0

अलिबाग । रायगड जिल्ह्यात हागणदारीमुक्ती मोहिमेंतर्गत उत्तम काम करण्यात आले असून, 94.32 टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 4 तालुके पूर्णपणे हागणदारीमुक्त झाले असून, उर्वरित तालुकेही हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 3 लाख 43 हजार 488 कुटुंबांपैकी केवळ 19 हजार 522 कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये नसून, त्यांना पाणी व स्वच्छता विभागाने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.

उघड्यावर शौचास बसणार्‍यांना आळा घालण्यासाठी गुडमॉर्निंग पथक
हागणदारीमुक्तीसाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. शौचालयाचे फायदे नागरिकांना समजावून सांगण्यात येत आहेत. भित्तीपत्रके, पथनाट्य या मार्फतही जनजागृती सुरु आहे. उघड्यावर शौचास बसणार्‍यांना आळा घालण्यासाठी गुडमॉर्निंग पथकही स्थापन करण्यात आले आहे. पाणी व स्वच्छता विभागाच्या या प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे जिल्ह्यातील वैयक्तिक शौचालयांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. रायगड जिल्ह्यात 3 लाख 43 हजार 488 कुटुंबे असून, यापैकी 3 लाख 23 हजार 966 कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत, तर 19 हजार 522 कुटुंबांनी अद्यापपर्यंत शौचालये बांधलेली नाहीत. या कुटुंबांनी शौचालये बांधावीत, यासाठी पाणी व स्वच्छता विभागाने आता मोहीम हाती घेतली आहे.

जिल्ह्यात सर्व कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधावीत यासाठी घरोघरी जनजागृती करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 94.32 टक्के कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. उर्वरित कुटुंबांनी शौचालये बांधावीत यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
– पी. एम. साळुंखे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग