रायगडमधील पर्यटनस्थळांसाठी 5. 87 लाखांचा निधी

0

अलिबाग : कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातंर्गत रायगड जिल्ह्यातील 22 पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 5 कोटी 87 लाख 28 हजार रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. 2015-16 तसेच 2016-17 या आर्थिक वर्षांमध्ये जिल्हास्तरीय समितीने हे प्रस्ताव राज्य सरकारकडे निधीसाठी पाठविले होते. ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटनस्थळांचा विकास होणार्या गावांमध्ये पर्यटनपूरक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 2015मध्ये राज्य सरकारने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम जाहिर केला होता. पर्यटनातून ग्रामीण भागातील भूमीपूत्रांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आला होता.

2015-16 या वर्षातील 10 प्रस्तावांना मान्यता
राज्य सरकारने 2015-16 या वर्षातील 10 प्रस्तावांना मान्यता दिली असून, या पयिटनस्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 3 कोटी 47 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. तर 2016-17 या वर्षातील 12 पर्यटनस्थळांवरील कामांसाठी 2 कोटी 40 लाख रुपयांचा असे एकूण 22 पर्यटनस्थळांवरील कामांसाठी 5 कोटी 87 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामधील 4 कोटी 21 लाख 68 हजार रुपये प्रत्यक्ष कामांवर खर्च करण्यात येणार असून, उर्वरित 1 कोटी 65 लाख 60 हजार रुपयांचा प्रशिक्षण क्षमता बांधणी, संकल्पचित्र व वास्तुविशारद यांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे.

अलिबागमधील 9 पर्यटनस्थळांचा समावेश
राज्य सरकारने मंजूर केलेल्या 22 पर्यटनस्थळांमध्ये अलिबाग तालुक्यातील सर्वाधिक 9 पर्यटनस्थळांचा समावेश असून, रोहा तालुक्यातील पाच तर महाड तालुक्यातील दोन पर्यटनस्थळाचा समावेश आहे. तसेच श्रीवर्धन, तळा, कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एक पर्यटनस्थळाचा समावेश आहे. कोकणातील ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. ग्रामीण पर्यटन विकास प्रकल्पाचे प्रस्ताव सादर करुन ते मंजूर करण्याची जबाबदारी या समित्यांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने 2015-16 व 2016-17 या आर्थिक वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यातील प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविले होते. राज्यस्तरीय समितीने या प्रस्तावांची छाननी करुन ते अंतिम मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठविले होते.

2015-16 वर्षातील मंजूर प्रस्ताव
तालुका – कामाचे नाव – मंजूर निधी
माणगाव – उमरोली शिवकालीन मंदीर रस्ता व परिसर सुधारणा – 38 लाख 84 हजार
रोहा – भुवनेश्वर शिवकालीन मंदिर व परिसर सुधारणा – 25 लाख
रोहा – दुरटोळी पुरातन शिवकालीन मंदिर व परिसर सुधारणा – 36 लाख
अलिबाग – चिंचोटी पर्यटनस्थळ रस्ता तयार करणे – 6 लाख 84 हजार
रोहा – सानेगाव पर्यटनस्थल रस्ता तयार करणे – 16 लाख
अलिबाग – वेश्वी तलाव परिसर सुधारणा – 32 लाख
रोहा – नोव्हे दत्त मंदिर पोहच रस्ता तयार करणे – 32 लाख
अलिबाग – रेवदंडा पर्यटनस्थल प्रसाधनगृह व स्वच्छतागृह बांधणे – 8 लाख
अलिबाग – पेझारीयेथे भक्तनिवास बांधणे – 20 लाख

2016-17 वर्षातील मंजूर प्रस्ताव
तालुका – कामाचे नाव – मंजूर निधी
श्रीवर्धन – शीरस्ते शिवकालीन जाखमाता मंदिराकडे जाणारा रस्ता बांधणे – 20 लाख
तळा – बौद्धकालीन कुडा निवास बांधणे व परिसर सुधारणा – 16 लाख
महाड – जिजामाता समाधीजवळील तलाव खोलीकरण व बळकटीकरण – 20 लाख
महाड – शिवथरघळ येथे भक्तनिवास बांधणे – 10 लाख
कर्जत – खांडस शिवमंदिर तलाव सुधारणा, धर्मशाळा व स्वच्छतागृह बांधणे – 15 लाख
खालापूर – होराळे पुरातन विठ्ठल मंदिर धर्मशाळा व स्वच्छतागृह बांधणे – 15 लाख
सुधागड – पाली बल्लालेश्वर परिसर सुधारणा व भक्तनिवास बांधणे – 22 लाख
अलिबाग – सारळ पर्यटनस्थळ पोहच रस्ता तयार करमे – 16 लाख
अलिबाग – नारंगी भुवनेश्वर मंदिर पोहच रस्ता तयार करणे – 16 लाख
अलिबाग – नागाव पर्यटनस्थल स्वच्छतागृह व प्रसाधनगृह बांधणे – 16 लाख
अलिबाग – सागरगड शंकर मंदिर सुधारणा – 8 लाख
अलिबाग – चरी कै. ना.ना. पाटील स्मारक परिसर सुधारणा – 18 लाख