रायगडमधील सर्व ग्रामपंचायती, सरकारी शाळांमध्ये वायफाय

0

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व सरकारी शाळांमध्ये वायफाय सुविधा पुरविण्यात येणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी 3 ऑगस्टरोजी केंद्र सरकार व राज्य सरकारमधील संबंधित विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. रायगडचे खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी जिल्ह्यात भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या योजनांचा आढावा घेतला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रायगड जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टीकल केबळ टाकण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत 700 ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टीकल केबळ टाकण्यासाठी पाईप टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामधील 405 ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टीकल केबल टाकण्यात आली असून, 131 ग्रामपंचायतींमध्ये वायफाय सुविधा सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी श्रीवर्धन, म्हसळा, खालापूर, मुरुड या चार तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींमध्ये वायफाय सुविधा पुरविण्याचे काम पूर्ण झाले असल्याचेही अनंत गीते यांनी सांगतिले. तसेच उरंवरित दोन महिन्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये वायफाय सुविधा पुरविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायतींमध्ये वायफाय सुविधा पुरविण्याचे काम पूर्ण झाले की जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये वायफाय सुविधा पुरविण्यात येमार आहे. याचे नियोजन करण्यासाठी 3 ऑगस्टरोजी दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही अनंत गीते यांनी दिली. भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या योजनांचा आढावा सर्व विभागांकडून घेतला. यामध्ये खासदार निधीतून करण्यात आलेली कामे, भारत सरकारच्या सर्व योजनांमधून करण्यात आलेली कामे यांचा आढावा घेत, प्रगतीपथावर असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.