अलिबाग । महिला बाल विकास विभागाने जाहीर केलेल्या अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधन वाढीच्या प्रस्तावावर गत वर्षापासून निर्णय प्रलंबित असल्याने अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील तीन हजार 283 अंगणवाड्यांना टाळे लागले आहेत. जिल्ह्यातील 6 हजार 566 मदतनिस व सेविका बेमुदत संपावर गेले आहेत. रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या दोन संघटना आहेत. या दोन्ही संघटना बेमुदत संपावर गेल्याने अंगणवाड्या बंद आहेत. यामुळै जिल्ह्यात बालके हिरमुसली असून अंगणवाडीतील किलबिल बंद झाली आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 3283 अंगणवाड्या आहेत. यामध्ये 2679 अंगणवाड्या आणि 604 मिनी अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील या सर्व अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनिस चिमुकल्यांना शिक्षणाचे आणि देशभक्तीचे धडे देण्याचे कार्य करतात. रायगड जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 55 हजार 340 चिमुकले हे धडे गिरवीत आहेत. या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी 6566 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत.
6566 अंगणवाडी कर्मचारी संपावर
20 जुलै 2016 रोजी महिला व बाल विकास विभागाने मानधन वाढ समितीचा शासकीय आदेश जारी केला. त्यानंतर विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी कर्मचारी कृतीसमितीने मानधनवाढीचा तक्ता बनविला. शासन पातळीवर यापुढे कोणतीही कृती न झाल्याने कृती समितीने 1 एप्रिल 2017 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी 30 मार्च 2017 रोजी विधानभवनात कृती समितीच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतली. या बैठकीत कृती समितीचे काही मुद्दे मान्य केल्याने 1 एप्रिलपासून घोषित केलेला संप मागे घेतला. तसचे 1 एप्रिलपासून मानधन वाढ लागू करण्यात येईल,असे आश्वासन या बैठकीमध्ये दिल्यानंतरही ते पाळण्यात आले नसल्याने कृती समितीच्यावतीने 11 सप्टेंबरपासून बेमुदत संंप करणार असल्याचे स्पष्ट केले हेाते.
त्यानंतरही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे दररोज सकाळी अंगणवाड्यांमध्ये बच्चे कंपनीचा किलबिलाट गेले दोन दिवस ग्रामीण भागात पहावयास मिळाला नाही. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनसह राज्यभरातील काही संघटनांनी अंगणवाड्यांच्या मदतनिस व सेविकांच्या मानधन प्रश्नी बंदची हाक दिली असल्याने 100 टक्के कर्मचारी यात सहभागी झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.