रायगडमध्ये जात पंचायतींची मुजोरी

0

अलिबाग । वाळीत प्रकरणांनी गाजलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये 45 प्रकरणे पोलिसात पोहोचलेली आहेत, तर खर्‍या घडलेल्या प्रकरणांचा आकडा हा नक्कीच याहून दुप्पट आहे. त्यामुळे या प्रकरणांचे गांभीर्य वाढले आहे. सामाजिक बहिष्कार कायदाही झाला. परंतु, आजही जातपंचायती, गावक्यांचाच कायदा सुरू असून रायगड सामाजिक बहिष्कारांच्या दुष्टचक्रातून बाहेर येत नाही. जिल्ह्यामध्ये अशा प्रकरणांचा बंदोबस्त व्हावा यासाठी लढे सुरू झाले होते. अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी येथील पीडितांना मार्गदर्शनही केले होते. प्रसारमाध्यमांनीही प्रश्‍न उचलून धरला. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी समंत भांगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ज्या ठिकाणी अशी प्रकरणे घडली अशा गावांना भेटी देऊन लोकप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यातच चिंचोटी या गावात एका वकिलाच्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. पोलिसांनी हे प्रकरण नीट हाताळले नाही. आजही मुजोर पंच कुटुंबाला जाचक ठरत आहेत.

21 व्या शतकात वावरत असलो, तरी जुन्या मानसिकतेच्या जोखडातून आपली अद्यापही मुक्तता झालेली नाही. याचा अनुभव सध्या समाजातून वाळीत असलेली कुटुंब घेत आहे. काहींना जमिनीच्या वादातून तर काहींना राजकीय दबावामुळे, तर काहींना जात पंचायतीतील पंचांचे नियम काही कुटुंबांवर एकाकी जगण्याची वेळ आली आहे. आता ही कुटुंबे आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्याची सकाळ केव्हा उजाडेल याचीच वाट पाहत आहेत.

सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणांमध्ये साक्षी पुरावे मिळत नसल्याने पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणांकडे दुर्लक्ष केले. मात्र, श्रीवर्धन हरिहरेश्‍वर येथील संतोष जाधव कुटुंबाने आपल्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवला. जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. जाधव यांची न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी बाजू मांडली, त्यानंतर खर्‍या अर्थाने वाळीत प्रकरणांना वाचा फुटली. न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर ताशोरे ओढीत या प्रकरणांमध्ये तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या या कडक भूमिकेनंतर रायगड जिल्ह्यात एकामागून एक वाळीत प्रकरणे समोर येऊ लागली. जिल्ह्यात आतापर्यंत 45 प्रकरणांमध्ये 271 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 24 गुन्ह्यांमध्येच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. काही प्रकरण दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळावी यासाठी गृह विभागाकडे पाठवण्यात आली आहेत, तर 8 प्रकरणांचा अद्याप तपास पूर्ण झालेला नाही.

मंदिराच्या जागेच्या वादामुळे भगत कुटुंबाला टाकले वाळीत
अलिबागपासून जवळच आलेल्या वसरोली कोळीवाड्यातील गावच्या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहणारे नारायण भगत यांचा मंदिराच्या जागेवरून पंच कमिटी, विश्‍वस्त मंडळ यांच्यात गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे. त्यावरून गावच्या पंच कमिटीने निर्णय घेऊन भगत कुटुंबाला वाळीत टाकले आहे. मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या भगत यांच्या होडीवर कुणी खलाशी म्हणून यायला तयार नाही. त्यामुळे हा व्यवसाय त्यांना बंद ठेवावा लागला आहे. गावातील कुणीही त्यांच्याशी बोलत नाही. असे भगत कुटुंबीयांचे म्हणणे आहे. भगत कुटुंबाला 25 वर्षांपूर्वी याच वादातून वाळीत टाकण्यात आले होते. आता नारायण भगत यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार 2 वर्षांपूर्वी अलिबाग पोलीस ठाण्यात केली असून, त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.