महाड । छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. कोकणची ही भूमी परशुरामाची नाही तर शिवप्रभूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही तांत्रिक अथवा वैदिकतेचे समर्थन केले नाही म्हणूनच छत्रपतींसमोर जो नतमस्तक झाला, त्याचे दारिद्र्यपण कायमचे संपले, असे प्रतीपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि व्याख्याते अमोल मिटकरी यांनी रायगडावर केले. अखिल भारतीय शाक्त शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने रायगडवर २४ सप्टेंबरला शिवरायांचा शाक्त राज्याभिषेक दिन पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिती तटकरे, पीएनपी शिक्षण संस्थेच्या संचालक चित्रलेखा पाटील, सौरभ खेडेकर, सुधीर भोसले, सुदर्शन तारक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुन तणपुरे होते.
आदिती तटकरे, चित्रलेखा पाटील यांचा हिरकणी पुरस्काराने गौरव
या कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे आणि चित्रलेखा पाटील यांचा हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आदिती तटकरे यांनी माती ही राजमातांसारखी आणि पुत्र हा शिवाजीराजांसारखा असावा. त्याचप्रमाणे राजमातांच्या विचारांचेहि अनुकरण करण्यात यावे, अशी अपेक्षाहि त्यांनी यावेळेस व्यक्त केली.
हिरकणी पुरस्काराने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर आगामी काळात रायगडमधील जनता आणि महिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले पीएनपीच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी महिलांचे उच्चशिक्षण आणि स्त्रीभू्रण हत्येच्या प्रकारांबाबत अधिक लक्ष देणे गरज व्यक्त केली.