पुणे : रायगड हे तरुणांचे स्फूर्तिस्थान आहे. त्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदशनाखाली तयार करण्यात आलेल्या 865 कोटी रुपयांच्या रायगड विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून, लवकरच त्याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांंनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 337 व्या पुण्यतिथि निमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समितीतर्फे आयोजित शिवपुण्यतिथीनिमित्त सोमवारी हजारो शिवभक्तांच्या साक्षीने रायगडावर अभिवादन कार्यक्रम पार पडला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, रायगड विकास आराखड्याचे प्रमुख विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, आमदार भारत गोगावले, प्रशांत ठाकुर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, अभिनेते राहुल सोलापूरकर, राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना यंदाचा शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार प्रदान करण्यात आला. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजीव कानिटकर , वीर बाजी पासलकर यांचे वंशज दादा पासलकर आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मिलिटरी बँड, तसेच स्थानिक पोलिसांतर्फे बंदुकीच्या 21 फैरी झाडून शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींना राहुल सोलापूरकर यांनी लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी कार्यरत राहण्याची शपथ दिली. रायगड विकास आराखड्याअंतर्गत समाधी मंदिर, राजदरबार, राजमाता जिजाऊंची समाधी आदींचा विकास प्राधान्याने करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी नमूद केले. मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी प्रास्ताविक केले. सदस्य मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष रघुजी राजे आंग्रे यांनी आभार मानले.