नवी मुंबई :- रायगड जिल्हा मेडिकल डिस्ट्रीब्युटर्स असोशिएशनचे माजी अध्यक्ष बी. के. ठाकूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने डॉ. समिर सहस्त्रबुद्धे यांच्या रूग्णालयातमंगळवारी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विद्या ठाकूर, मुले प्रशांत व पराग, सुना शमा, स्मिता, बंधू पदाजीशेठ ठाकूर, डॉ. चंदन ठाकूर, चिर्ले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जे. के. ठाकूर, भगिणी श्रीमती हिराबाई हरिश्चंद्र कडू, तसेच पुतणे, नातवंडे, भावजया असा मोठा परिवार आहे.
ठाकूर यांचा जन्म चिर्ले (उरण) येथील शेतकरी कुटूंबात झाला.त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेवून पुढे ते महसूल विभागात नोकरीस रूजू झाले. 1972 मध्ये ते पनवेल येथून नायब तहसीलदार पदाचा राजीनामा देवून स्वतंत्र व्यवसायाकडे वळले. त्यांनी शहरात स्वस्तिक मेडिकल जनरल स्टोअर्स सुरू केले. तेथूनच त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. सामाजिक कार्यात रममाण झालेले ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या सपंर्कात आले. त्यांनी शेकापक्षात झोकून दिले. दि. बा. पाटील, दत्तूशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शेकाप पनवेल शहरात रूजविला. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत त्यांच्यावर शहर चिटणीस पदाची जबाबदारी पक्षाने सोपविली होती. शेकापने त्यांना पनवेल नगर परिषदेच्या निवडणूकीत उतरविले आणि ते नगरसेवक झाले. पुढे त्यांच्याकडे पनवेल को-ऑप. अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदाची सुत्रे सोपविण्यात आली. त्यांनी बँकेची उत्तमोत्तम प्रगती साधत बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्याच दरम्यान, ते विठोबा खंडाप्पा हायस्कूलचे चेअरमन होते. माजी आमदार विवेक पाटील यांचे उजवे हात मानले जात होते. दोघांची राम-लक्ष्मणाची जोडी त्याकाळी ओळखली जात होती. पुढे शेकापच्या नेत्यांनी त्यांना नगर परिषदेची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यानंतर ते शेकापतून बाहेर पडले. दरम्यानच्या काळात ते भाजपाच्या संपर्कात आले. विद्यमान सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी भाजपाची पनवेल विधानसभेची उमेदवारी 1995 च्या निवडणूकीत त्यांना दिली. त्यांना त्यात पराभव पत्कारावा लागला. तेव्हापासून ते राजकीय परिघापासून अलिप्त राहू लागले होते.
रायगड जिल्ह्यातील मेडिकल असोशिएशनची संघटना भक्कम करत त्यांनी अनेक तरूणांना रोजगार उपलब्ध करून देताना मेडिकल स्टोअर्सची स्थापना करण्याचा कानमंत्र दिला. त्यातूनच जिल्ह्याभरात मेडिकल स्टोअर्सचे जाळे विणले गेले आहे. मंगळवारी पहाटे 3 वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुत्र प्रशांत व पराग यांनी तात्काळ डॉ. समिर सहस्त्रबुद्धे यांच्या रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळी सर्वत्र वार्यासारखे पसरले आणि त्यांच्या चाहत्यांनी कल्पतरू येथील निवासस्थानी धाव घेतली. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात हिंदू धर्माच्या परंपरेनुसार मंत्रोपच्चाराने त्यांच्या पार्थिवाला पुत्र प्रशांत याने अग्नी दिला. महाराष्ट्र-गोवा बार असोशिएशनच्यावतीने ऍड. पाटील (भिवंडी), पनवेल अर्बन बँकेचे माजी चेअरमन बी. पी. म्हात्रे सर, श्री. डी. बी. माळी आदींनी भावपूर्ण शब्दांनी आदरांजली अर्पण केली.
अंत्ययात्रेत शेकापचे माजी आमदार विवेक पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, माजी सभापती काशिनाथ पाटील, माजी तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, नगरसेवक प्रितम म्हात्रे, भाजपाचे गटनेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, पेणचे शेकाप नेते पी. डी. पाटील, भिवंडीचे डॉ. पाटील परिवार, अग्रसेन मासिकाचे संपादक किरण ठाकूर, दै. निर्भीड लेखचे संपादक कांतीलाल कडू, मनिष गोडबोले, शैलेश आघारकर, मेडिकल असोशिएशनचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर सहभागी झाले होते.