जिल्हा परिषदेच्या १३९३१ तर ११५६ नगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
सचिन पाटील – अलिबाग । खाजगी शाळेमधील शिक्षण पद्धती पाहून पालकांचा पाल्याला खाजगी शाळेत टाकण्याचा कल वाढत असला तरी २०१७-१८ या वर्षामध्ये पहिलीच्या वर्गात शासनाच्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांमध्ये खासगी शाळांपेक्षा दुपट्टीने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा झेडपी व नगरपालिका शाळांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे. एकीकडे खासगी शाळांचे आकर्षण असतांना रायगड जिल्ह्यात स्थिती वेगळीच पहायला मिळत आहे. सरकारी शाळांना जिल्ह्यात अच्छे दिन आले असल्याचे म्हटले जात आहे.
झेडपी व नगरपालिका शाळांना येणार गतवैभव
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गासाठी एकूण २२५४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये ११४३१ मुले तर ११११३ मुली आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १३९३१ तर ११५६ नगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर ७४५७ विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. २०१६-१७ शैक्षणिक वर्षामध्ये एकूण ४७५२७ विद्यार्थ्यांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला असून १८१३८ जणांनी झेडपी शाळेत, तर ११५४ विद्यार्थ्यांनी न.प. शाळेत प्रवेश घेतला होता. तर २८२३५ विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र या शैक्षणिक वर्षात खासगी शाळेत प्रवेशाचा कल कमी झाला असून झेडपी व न.प. शाळांमध्ये प्रवेश वाढला आहे.
खासगी शाळांचे आकर्षण कमी
खाजगी इंग्लिश मीडियम शाळांचे वातावरण, रंगीबेरंगी शाळा, पटांगणे, शिक्षणाची पद्धत यामुळे आपला पाल्यही खाजगी शाळेत शिकावा, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये पुस्तके, कपडे, जेवण या सुविधा मोफत मिळत असूनही पालक आपल्याला पाल्याला शासनाच्या शाळेत पाठवित नाही. मात्र, जिल्ह्यात झेडपी व न.प. शाळानीही आपल्या शाळेचा दर्जा वाढवीत, मुलांना व पालकांना सरकारी शाळांची आवड लागावी यासाठी खासगी शाळेच्या धर्तीवर शिक्षण पद्धत अवलंबविली आहे. त्यामुळे पालकांचा सरकारी शाळांमध्ये पाल्यांना टाकण्याचा कल आता हळूहळू वाढू लागलेला आहे. त्याचबरोबर खाजगी शाळेतील शिक्षण हे आधुनिक पद्धतीचे असले तरी ते खर्चीक असल्याने सामान्य नागरिकाच्या आटोक्याच्या बाहेर आहे. झेडपी व न.प शाळाही आता आधुनिक पद्धतीचे शिक्षण पद्धत अवलंब करीत असल्याने पुन्हा एकदा या सरकारी शाळांनाही पूर्वीचे वैभव प्राप्त होऊ लागले आहे.