रायगडावरील ढोलवादनाचा राष्ट्रवादीकडून निषेध

0

पिंपरी-चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला स्मारक मंडळ समितीने रायगडावर ढोल ताशा वाजवला. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी इम्रान शेख, सोहेल सय्यद, मुन्ना शेख, इरफान शेख, राजू विश्वकर्मा, जावेद आवटी, वसीम शेख, सोमेस्वर परांडे, सुनील जांगीड, रवी थापा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सांस्कृतिक मंत्र्यांनी नाकारली परवानगी
रायगडावर ढोल-ताशा वाजविण्यासाठी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी रायगड स्मारक मंडळ समितीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे परवानगी मागितली होती. सुरुवातीला मंत्री विनोद तावडे यांनी यासाठी परवानगी दिली. मात्र पुण्यतिथीला ढोल-ताशा वाजविणे निषेधार्ह आहे. त्यामुळे राज्यभरातून नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. नागरिकांचा वाढता विरोध पाहता मंत्री विनोद तावडे यांनी दिलेली परवानगी नाकारली होती.

राष्ट्रवादीकडून कृत्याचा निषेध
सांस्कृतिक मंत्र्यांनी परवानगी नाकारली तरीदेखील जगदीश कदम व तेथील मंडळाने जबरदस्तीने ढोल-ताशा वाजवून आनंद व्यक्त केला. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे साहसी खेळही घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनी ढोल-ताशा वाजवून आनंद व्यक्त करणे, ही निषेधाची बाब आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करत या कृत्याचा निषेध करण्यात आला.