रायगड किनार्‍यांवर मासळीचा दुष्काळ, त्यात जेली फिशची भीती

0

मुरूड । गेले महिनाभर आमच्या बोटी इथेच किनार्‍यावर आहेत. मासळी मिळत नाही. त्यामुळे येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. नवगाव समुद्रकिनारी जवळपास 170 मच्छीमार बोटींनी गेल्या महिनाभरापासून नांगर टाकला आहे. मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांकडे बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्यायच उरला नाही. त्यातच इथल्या मच्छीमारांना जेली फिशच्या भीतीने ग्रासले आहे. महिनाभरापूर्वी रायगडच्या किनार्‍यांवर जेली फिश आढळले होते. अलीकडे इथल्या समुद्रात जेली फिशचा वावर वाढला आहे. त्याने डंख केला, तर दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्या भीतीने खलाशी बोटीवर जायला तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पर्सनेट मासेमारीमुळे छोट्या मच्छीमारांचे जगणे कठीण
बोट समुद्रात नेली तर डिझेल आणि इतर बाबींवर पैसे खर्च अंगावर पडतो. मासे मिळत नसल्याने खलांशांना पैसे देता येत नाहीत. मासेमारी करणे आता परवडत नाही. खोल समुद्रात होत असलेल्या पर्सनेट मासेमारीमुळे छोट्या मच्छीमारांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. नवगावसह अलिबाग तालुक्यातील रेवस, थळ, साखर, अलिबाग, आक्षी, रेवदंडा येथील मच्छीमारांची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. तेथील बंदरांवर असाच शुकशुकाट पहायला मिळत आहे. गेले महिनाभर काम नसल्याने नवगावमधील तब्बल 800 हून अधिक परप्रांतीय खलाशी चक्क आपल्या गावी निघून गेलेत. त्यामुळे मासेमारीवर अवलंबून असलेले इतर व्यवसायही बंद आहेत.

मच्छीमारांना कुणी वाली नाही
कोकणातील मच्छीमार बंदरांवर लाकडी काठ्यांची विशिष्ट पद्धतीची मांडणी पहायला मिळते. याला त्यांच्या भाषेत व्हलांडी असे म्हणतात. बोंबील, वाकटी सुकवण्यासाठी याचा वापर होतो. परंतु गेल्या महिनाभरापासून ही व्हलांडी मासळीच्या प्रतीक्षेत आहेत. जवळा वाहून नेणारे ड्रम, मासळी सुकवण्याचे ओटेही रिकामेच असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. मासळी सुकवण्याचे काम महिला करतात, त्यातून त्यांना चांगला रोजगार मिळतो. परंतु, रोज नसल्याने खायचे काय, असा प्रश्‍न या महिलांना पडला आहे. सरकार शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेते, विरोधकही त्यांचा आवाज उचलून धरतात, त्यांना भरपाई मिळते, कर्जमाफी होते, मात्र आम्हाला कुणी वालीच उरला नसल्याची खंत नवेदर नवगाव बोरेश्‍वर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष उमेश पावशे यांनी खंत व्यक्त केली.