रायगड किल्ल्याची स्वच्छता व पावित्र्य राखणे सर्वांचे कर्तव्य

0

महाड : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या रायगड किल्ल्याची स्वच्छता व पावित्र्य राखणे सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणूनच रायगड व परिसराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सोमवारी पदभार स्विकारल्यानंतर रायगडाला 25 जुलैला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. येथे त्यांनी रायगड संवर्धन व परिसर विकास आराखड्याच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, अधिक्षक अभियंता विशेष स्थापत्य पथक रायगड किल्ला, प्रांताधिकारी विठ्ठल ईनामदार, तहसिलदार चंद्रसेन पवार, वन विभाग, कृषि विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पर्यटकांची व्यवस्था व सुरक्षेबाबत घेतला आढावा
यावेळी जिल्हाधिकार्यांसनी येणार्‍या पर्यटकांचा ओघ वाढतो त्यावेळी करावयाच्या व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदींचाही आढावा घेतला. या आराखड्याअंतर्गत असलेली कामे ही आखून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार व्हावीत अशा सुचनाही त्यांनी दिल्या. रायगडाचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने किल्ल्याची नियमित व विशेष स्वच्छता होणे आवश्यक आहे. त्यासाठी किल्ल्यावर प्लास्टिक कचरा निर्मूलनास प्राधान्य द्यावे. विशेष स्वच्छता मोहिमेसाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या श्रमदान शिबीरांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सुचविले.