नागोठणे । ब्रुहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या मान्यतेने व रायगड जिल्हा योगा संघटनेच्या वतीने 12 वी रायगड जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धा येथील जे. एच. अंबानी पेट्रोकेमिकल्स विद्यालयात शनिवारी पार पडली. स्पर्धेचे उदघाटन संघटनेचे सचिव संदीप गुरव यांनी केले, तर बक्षीस वितरण रायगड जिल्हा योगा संघटनेच्या अध्यक्ष अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे क्रीडा शिक्षक डी. के. म्हात्रे, प्रल्हाद गुरव, राजेंद्र पाटील,भरत गुरव आदी मान्यवरांसह योगाप्रेमी उपस्थित होते. या वेळी अदितीताईनी आपल्या भाषणांत योगाचे महत्त्व सांगताना योग, आपले शरीर निरोगी आणि सुदृढ असावे व मन प्रसन्न असावे असे आपल्याला वाटते; पण वेळ नाही या सबबीखाली आपण त्याकडे दुर्लक्ष करून विविध आजारांना आमंत्रण देतो. कळते पण वळत नाही’ हा वाक्प्रचार आता हद्दपार करण्याची खरोखरच वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.
खेळाडूंचे अभिनंदन!
जो निरोगी असतो तो आयुष्याचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. नियमित योगसाधनेमुळे रोगप्रतिकार शक्तीत वाढ होऊन आरोग्य संपन्नता येते. अनेक गंभीर आजारात योगासनांचे महत्व अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टरही मान्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. योगाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही तालुक्यांमधील अनक शाळांमध्ये विद्यार्थी तसेच क्रीडा शिक्षकांना योगाचे धडे देण्याचा उपक्रम राबवला असून पुढेही संघटनेमार्फत असे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. या वेळी विजयी झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले व या स्पर्धेतून विजयी झालेले खेळाडू मोर्शी, अमरावती येथे होणार्या 36 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे खेळाडू उकृष्ट कामगिरी करून रायगड जिल्ह्याचे नाव नक्कीच उज्वल करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.