अलिबाग (प्रणय पाटील) : रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दूषित पाणी पित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा आरोग्य प्रपयोगशाळा तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रना यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 22.83 पाणीस्त्रोत दूषित असल्याचे निष्पन्न झाले असून, 258 गावे दूषित पाणी पित आहेत. यामुळे जिल्ह्यात साथीचे आजार फैलावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सर्वात जास्त दूषित पाण्याचे प्रमाण श्रीवर्धन तालुक्यात आहे. जून महिन्यात रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 14 तालुक्यांमधील एकूण 1 हजार 130 पाणी नमूने तपासण्यात आले. यापैकी 258 नमुने दूषित आढळून आले. दूषित पाण्याची टक्केवारी 22.83 टक्के इतकी आहे. दूषित पाण्याची टक्केवारी घातक असून, दूषित पाणी पोटात गेल्याने विविध जलजन्य आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे नळयोजनेचे किंवा शुद्धीकरण केलेले पाणीच प्यायले पाहिजे असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. दरम्यान, पाण्यातील अणूजीव तपासणीबरोबरच रासायनिक पाणी नमुने तपासणीही करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे़
शासनाचे प्रयत्न पडताहेत अपुरे
जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करता यावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. विहिरींमधील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतींना ब्लिचींग पावडर पुरविलेली आहे़ ती पाण्यात टाकने आवश्यक आहे़ तसेच घरात पाणी शुद्धीकरण करण्यासाठी नागरिकांना लिक्वीड क्लोरिनचे वाटप करण्यात येत आहे, मात्र हे प्रयत्न अपुरे पडले असून, नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.
श्रीवर्धनमध्ये 54 टक्के पाणी दूषित
रायगड जिल्ह्यातील तपासलेल्या पाणी नमुन्यांमध्ये 22.83 टक्के दूषित नमुने आढळले असून, श्रीवर्धनमध्ये सर्वात जास्त 54.10 टक्के पाणी नमुने दूषित आढळले आहेत. श्रीवर्धनमधील तपासण्यात आलेल्या 61 पैकी 33 पाणी नमुने दूषित आढळले. तर उरण व सुधागड तालुक्यातील पाणी शुद्ध असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या दोन्ही तालुक्यात एकही दूषित पाणी नमुना आढळला नाही. सुधागड तालुक्यात 29 तर उरण तालुक्यात 31 पाणी नमुने तपासण्यात आले. तर पोलादपूर तालुक्यातील एकही पाणी नमुना तपासण्यात आला नाही.
तालुका – तपासलेले पाणी नमुणे – दुषित पाणी नमुने
अलिबाग – 149 – 46
म्हसळा – 35 – 11
सुधागड – 29 – 0
श्रीवर्धन – 61 – 33
मुरुड – 55 – 16
खालापूर – 74 – 2
पेण – 148 – 39
पनवेल – 83 – 33
उरण – 31 – 0
रोहा – 83 – 2
महाड – 119 – 28
माणगाव – 110 – 12
तळा – 26 – 2
कर्जत 127 – 34