अलिबाग । रायगड जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात महाड, कर्जत, खालापूर तालुक्यात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले असून याबाबत पोलीस यंत्रणा मात्र कुचकामी ठरत आहे. या वाढलेल्या चोरी व घरफोडी बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तर नागरिकही चोराच्या या कृत्याने हैराण झाले आहे. रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात 16 घरफोडी तर 37 चोरी प्रकरणे पोलीस ठाण्यात दाखल झाली आहेत. ऑगस्ट महिन्यात घरफोडीमध्ये वाढ झाली असून 24 ठिकाणी घरफोडीचे तसेच 32 चोरीचे गुन्हे त्या त्या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलीस अपयशी
घरफोडी मध्ये मोठ्या प्रमाणत बंद घरे फोडलेली असून काही भर वस्तीतील घरेही फोडलेली आहेत. तर चोरी मध्ये लहान मोठ्या चोरीसकट चेन चोरी, वाहने चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेली आहेत. जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे चोरी झाल्याची तक्रार दाखल होत आहेत. मात्र घडणार्या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत आहे.
जिल्ह्यात महाड, कर्जत, खालापूर तालुक्यात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले असून यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आपले घर सोडून बाहेरगावी जाण्यासही नागरिक घाबरत आहेत.
कर्जत, खोपोली याभागात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले असले तरी लवकरच आरोपी पकडण्यात पोलिसांना यश येईल. यासाठी कर्जत व खोपोली येथे स्पेशल पोलीस यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्यामुळे या भागातील झालेल्या गुन्ह्याचा तपास लवकर लावण्यास मदत होणार आहे.
-अनिल पारसकर, जिल्हा अधीक्षक