रायगड जिल्ह्यात पावसाच्या दडीने भात लावण्या खोळंबल्या

0

अलिबाग। गेल्या 8 दिवसांपासून पावसामुळे दडी मारल्यामुळे आता राब तयार होऊनही पाणी शेतात पाणी नसल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. शेतीच्या कामांना वेग आला आहे. भात लावणीची कामे जवळपास 40 टक्केच पूर्ण झाली आहेत. चांगला पाऊस पडला तर 15 जुलैपर्यंत जिल्ह्यातील भात लावणीची कामे 60 टक्के पूर्ण होतील. भात लावणीसाठी पावसाची अपेक्षा बळीराजाला होती. तसा पाऊस मात्र पडत नव्हता. पण, मागील 8 दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे.

1 लाख 23 हजार हेक्टरवर भात लागवड; खते सर्वत्र उपलब्ध
भातशेतीसाठी खरीप हंगामात 28 हजार क्विंटल खते लागणार आहेत. जिल्ह्यात खत पुरेसे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने खत कंपन्यांसोबत संपर्क साधला आहे. 28 हजार मेट्रिक टन खातापैकी युरीया जातीचे 19 हजार 500 मेट्रिक टन खत जिल्ह्यात लागणार आहे. तर एस.एस.पी. 1 हजार 700 मेट्रिक टन, एफ.ओ.पी. 1 हजार 700 मेट्रिक टन व इतर जातींचे 5 हजार 100 मेट्रिक टन खते लागणार आहेत.

जिल्ह्यात 1 लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. प्रती हेक्टर 30 क्विंटल उत्पादनाचे उद्दिष्ट कृषी विभागाने नजरे समोर ठेवले. सध्या जवळपास 40 टक्के भात लागवड पूर्ण झाली आहे. पावसाने साथ दिली तर 15 जुलैपर्यंत जिल्ह्यातील भात लावणीची कामे 50 टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण होतील, असा विश्वास जिल्ह्याच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

सिंचनासाठी नव्हे कंपन्यांसाठी पाणी
रायगड जिल्ह्यात मुख्यतः भाताचे पीक घेतले जाते. दक्षिण रायगडातील माणगाव, रोहा, कोलाड परिसर तसेच पेणचा काही भाग वगळता भाताची शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. त्यामुळे येथील शेतकरी नेहमीच पावसाकडे डोळे लावून बसलेला असतो. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण नंतर पावसाने दडी मारली. त्यानंतरही पावसाने साथ दिल्याने शेतीची इतर कामे शेतकर्‍याला करता आली. सध्या अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील धरणे कंपन्यांना पाणी मिळावे यासाठीच आहेत. शेतकर्‍यांना त्याचा फायदा नाही, असा आरोप शेतकरी करतात.