अलिबाग : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी योजना सुरु केली आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या वतीने कर्जमाफीस पात्र असणार्या शेतकर्यांकडून ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेला सलंग्न असणार्या सर्वच विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकर्यांचे फॉर्म बँकेच्या मदतीने भरून देण्याच्या सुचना बँकेने संस्थांच्या सचिवांना केल्या आहेत.
फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड आवश्यक
फॉर्म रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेल्या महा ई-सेवा केंद्र या ठिकाणी शेतकर्यांना कर्जमाफीची मोफत अर्ज भरण्याची सोय केली आहे. शेतकर्यांना हा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड समवेत मोबाईल क्रमांक लिंक केलेला असणे आवश्यक आहे, जर आधार कार्ड असेल परंतु त्यास मोबाईल क्रमांक लिंक केलेला नसेल तर अशा शेतकर्यांचे बायोमेट्रिक्स पद्धतीने हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
फॉर्म भरण्याचे बँकेकडून आवाहन
जिल्हयामध्ये ऑनलाईन कर्जमाफीचे फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे क्षेत्रीय कर्मचारी यामध्ये शेतकर्यांना सहाय्य करीत आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या शेतकर्यांचे ऑफलाईन पद्धतीने देखील फॉर्म भरून घेतले जात आहेत. यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्यांनी शासनाच्या योजनेतील निकषांच्या आधारावर कर्जमाफीसाठी, प्रोत्साहनपर इतर लाभ मिळवण्यासाठी त्वरित फॉर्म भरावे असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.