रायगड जिल्ह्यात बाल, मातामृत्यू सुरूच

0

अलिबाग- केंद्र व राज्य सरकार ग्रामीण तसेच शहरी भागात बालमृत्यू तसेच मातामृत्यू रोखण्यासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात येतो. यामुळे बालमृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात यश मिळाले असले तरी, आजही रायगड जिल्ह्यात बालमृत्यू तसेच मातामृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडील आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 2016-17 या आर्थिक वर्षभरात रायगड जिल्ह्यात 305 बालमृत्यू तर 26 मातामृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

आरोग्य यंत्रणेकडून दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नवजात बालकांसाठी व त्यांच्या मातांसाठी कोट्यवधींचा निधी खर्चून त्यांच्या संगोपणासाठी उच्च प्रतिच्या योजना राबविण्यात येतात. तसेच आरोग्य यंत्रणेमार्फत केंद्र सरकारची राष्ट्रीय बाल सुरक्षा योजना तर राज्य सरकारतर्फे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येतो. यासाठी आरोग्य विभागाजवळ कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका अशी फौजही आहे. यासह विविध माध्यमातून बालकांची पालकांनी काळजी कशी घ्यावी, तसेच मातांनी कोणती काळजी घ्यावी, यासाठी जनजागृतीचे कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत. या सर्व बाबींमुळे रायगड जिल्ह्यात बालमृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात यश मिळाले असले तरी, आजही जिल्ह्यात बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे. 2012-13 या वर्षात जिल्ह्यात 449 बालमृत्यू तर 33 मातामृत्यू झाल ेहोते. या प्रमाणात घट होऊन 2016-17 या वर्षात जिल्ह्यात 305 बालमृत्यू तर 26 मातामृत्यू झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येणारे प्रयत्न
जिल्ह्यात एक हजार लोकसंख्येपाठी एका आशा स्वयंसेविकेची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गरोदर मातांची माहिती मिळताच मातांवर उपचार सुरु होतात. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, 23 प्राथमिक आरोग्यकेंद्र, 82 उपप्राथमिक आरोग्य केंद्र, 365 ग्राणीण रुग्णालये, 821 पी.एस.सी.मध्ये गरोदर माता व बालकांवर उपचार करण्यात येतात. तसेच बालाकंची प्रकृती गंभीर किंवा वजन कमी असल्यास त्यांच्यावर ग्रामबाल सुधार केंद्रात 30 दिवस आहार व औषोधोपचार केला जातो.

वर्ष – बालमृत्यू – मातामृत्यू
2012-13 – 449 – 33
2013-14 – 388 – 28
2014-15 – 342 – 27
2015-16 – 328 – 29
2016-17 – 305 – 26