रायबरेलीतून ना सोनिया गांधी, ना प्रियंका गांधी निवडून येणार 

0

नवी दिल्ली । आगामी निवडणुकीत रायबरेली मतदार संघातून ना सोनिया गांधी, ना प्रियांका गांधी निवडून येणार, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिनेश प्रताप सिंह यांनी केली आहे.  दिनेश प्रताप सिंह हे शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रायबरेलीत काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दिनेश सिंह म्हणाले की, रायबरेलीतून ना सोनिया गांधी निवडून येणार ना प्रियंका गांधी त्यांच्यापैकी कोणीही निवडून येणार नाही, असा शब्द मी भाजपाला दिला आहे. काँग्रेस पक्षाला मी माझ्या भावाला तिकीट देण्याची विनंती प्रियंका गांधींना केली होती. मात्र त्यांनी माझी विनंती धुडकावून लावत रायबरेलीतून कोणत्याही ठाकूर समाजाच्या माणसाला तिकिट देणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीच माझा लहान भाऊ राकेश सिंहला भाजपने तिकीट देऊ केले होते. परंतु माझ्या शब्दाखातर त्याने ते तिकीट घेतले नाही. मी माझा विधान परिषदेच्या आमदारकी पदाचा राजीनामा प्रियंका गांधी यांच्याकडे देऊ केला होता. मात्र, यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. याबाबतही मी प्रियंका गांधींना फोन केला तेव्हा त्यांनी काँग्रेस आणि सपाची युती झाली तर तुमचा राजीनामा स्वीकारू, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर नाराज होऊन पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला, असेही दिनेश सिंह यांनी म्हटले आहे. मी आता भाजपामध्ये प्रवेश करतो आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याचे मी ठरवले आहे.

दिनेश सिंह यांनी काँग्रेसवर आरोप केलेले असताना काँग्रेसनेही त्यांच्यावर टीका केली आहे. दिनेश सिंह हे सपा तसेच बसपामध्ये असतांना निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यावेळी हे दोन्ही पक्ष सोडून काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेच्या आमदारकीचा आश्रय दिला होता. मात्र आता ते आपल्या स्वार्थासाठी पक्षाला विसरले अशी टीका काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व्ही. के. शुक्ला यांनी केली आहे..